कुरनूरला प्राथमिक आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्याची मागणी; आरोग्य मंत्री टोपे यांना ग्रामपंचायतीतर्फे निवेदन
अक्कलकोट, दि.३१ : अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्राला मंजुरी मिळावी या मागणीसाठी ग्रामपंचायतीच्यावतीने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांना सरपं व्यंकट मोरे यांनी ग्रामस्थांसह निवेदन सादर केले. गोकुळ शुगरच्या कार्यक्रमासाठी आरोग्य मंत्री टोपे हे धोत्री येथे आले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी ही मागणी केली.
कुरनूर हे गाव साधारण पाच ते सहा हजार लोकवस्तीचे आहे.या गावच्या पश्चिम दिशेला बोरी व हरणा या दोन नद्या आहेत आणि कुरनूर धरण देखील आहे. धरण भरल्यानंतर चप्पळगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचा संपर्क तुटतो तसेच जवळ असलेल्या चुंगी आरोग्य उपकेंद्रला जाण्यासाठी नीट रस्ता नसल्याने पावसाळ्यात मोठी अडचण निर्माण होते. म्हणून याठिकाणी प्राथमिक उपचार म्हणून उपकेंद्राची गरज आहे.
सिंदखेड, मोट्याळ गाव या उपकेंद्राला जोडून कुरनूरसाठी स्वतंत्र उपकेंद्र मंजूर व्हावे ही मागणी आमची असल्याचे सरपंच मोरे यांनी सांगितले. गेल्या अनेक दिवसांपासून सरपंच मोरे यासाठी प्रयत्नशील आहेत. पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेच्या पातळीवरती पाठपुरावा झाला असून तो आता त्याला आरोग्य मंत्रालयाच्या पातळीवरती मंजुरी मिळणे बाकी आहे. या पार्श्वभूमीवर गोकुळ शुगरचे चेअरमन दत्ता शिंदे यांनीही ही बाब आरोग्य मंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर आरोग्यमंत्र्यांनी उपकेंद्र मंजूर करण्याचे आश्वासन दिले.
यावेळी उपसरपंच आयुब तांबोळी, तंटामुक्त अध्यक्ष केशव मोरे, सुरेश बिराजदार, भीम मोरे, ज्ञानेश्वर बनसोडे, बंडू बेडगे आदी उपस्थित होते.