अक्कलकोट, दि.२७ : अक्कलकोट तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानातून देण्यात येणारे धान्य निकृष्ट दर्जाचे असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडी अक्कलकोटच्या वतीने करण्यात आली आहे. ही बाब प्रांताधिकारी आणि तहसीलदार यांना निदर्शनास आणून दिल्याने काय कारवाई होणार ? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
याबाबतची माहिती वंचित बहुजन आघाडी च्या कार्यकर्त्यांना मिळताच प्रत्यक्षात धान्य घेऊन जाऊन प्रांताधिकारी सुप्रिया डांगे व तहसीलदार अंजली मरोड यांना दाखविले.अक्कलकोट तालुक्यातील सर्वसामान्य जनता व गोरगरीबांचे पोट या रेशनदुकानावर अवलंबून असते. काही कुटुंब तर केवळ स्वस्त धान्यावर अवलंबून आहेत असे असताना असा प्रकार निदर्शनास आला आहे. कोरोनाच्या भयानक विषाणूच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून जे धान्य वाटप केले जात आहे ते धान्य जनावर सुद्धा खाणार नाहीत आणि सर्व प्रकारच्या धान्याला कीड लागलेली आहे, बुरशी चढलेली आहे,अशी तक्रार चंद्रकांत मडीखांबे यांनी केली आहे.
या प्रकरणी पुन्हा वंचित बहुजन आघाडीच्यावतीने प्रांत अधिकारी आणि तहसीलदार यांची भेट घेऊन येणाऱ्या तीन दिवसात हे धान्य जर परत घेतले नाही तर स्वस्त धान्य दुकानातून तो धान्य तहसील कार्यालयासमोर आणून पुरवठा अधिकारी व अन्य अधिकाऱ्यांना धान्य वाटप करण्याचा कार्यक्रम वंचित बहुजन आघाडी करेल, असा इशारा वंचितच्यावतीने देण्यात आला आहे.
याप्रसंगी वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष चंद्रशेखर मडीखांबे, जिल्हा सचिव देवानंद अस्वले, वंचितचे युवा नेते प्रकाश शिंदे, तालुका सचिव खाजाप्पा हिवाळे, प्रकाश मोरे, वागदरीचे उमेश बनसोडे, यल्लाप्पा बनसोडे व कार्यकर्ते उपस्थित होते.