मुंबई : वृत्तसंस्था
वैनगंगा आणि नळगंगा प्रकल्प हा मराठवाडा आणि विदर्भातील शेतकऱ्यांमध्ये क्रांती आणणारा प्रकल्प आहे पुन्हा कर्ज काढा, पण तो प्रकल्प पूर्ण करा, असे म्हणत या प्रकल्पाला भरघोस निधी उपलब्ध करून देण्यात यावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारकडे केली आहे.
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि तीस जिल्हा परिषदांच्या निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे महानगरपालिकेत प्रशासकांच्या हातात कारभार गेलेला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे लोकप्रतिनिधी नसल्यामुळे केंद्र सरकारकडून मिळणाऱ्या सहा हजार कोटी रुपयांचे राज्याचे नुकसान झाले आहे, याला जबाबदार कोण? असा सवालही त्यांनी विचारला आहे.
अर्थसंकल्पावरील उत्तरानंतर ‘राईट टू रिप्लाय’मध्ये वडेट्टीवार बोलत होते. ते म्हणाले, महाराष्ट्रातील सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे बळीराजा देशोधडीला लागला आहे. या अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी ठोस तरतूद केली नाही. शेतकरी संकटात आहे तर घोटाळेबाजांना मात्र या राज्यात चांगले दिवस आले आहेत. अपात्र अधिकाऱ्यांना हवे ते पद देऊन सरकार हवी ती कामे करून घेत आहे, अशी टीका त्यांनी केली. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनातील घोषणांची अंमलबजावणी नाही. विदर्भातील, मराठवाड्यातील शेतकऱ्यांची, जनतेची फसवणूक केली आहे. झोपडपट्टी पुनर्वसन योजनेत घोटाळा, ठाणे येथील मोघरपाडा मेट्रोच्या कामात घोटाळा, रेट कॉण्ट्रक घोटाळा, मिठागरांच्या जमिनींबाबतचा घोटाळा, जलजीवन मिशन घोटाळा, साडी घोटाळा, मोबाईल घोटाळा अशा घोटाळ्यांची मालिका राज्यात सुरू आहे, असा आरोप वडेट्टीवार यांनी केला आहे.