प्रतापगड : प्रतापगडच्या पायथ्याला असलेल्या अफझलखानाच्या कबरीसमोरचं अनधिकृत बांधकाम पाडण्यात येत आहे. महसूल आणि वनविभागाकडून बांधकाम पाडण्याचं काम केलं जात आहे. प्रतापगडाच्या पायथ्याला छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला गेला. त्यानतंर पायथ्यालाच कबर बांधली गेली. अफझलखानाच्या कबरीशेजारी करण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्याचे आदेश न्यायालयाने दिले होते. त्या आदेशाची अंमलबजावणी प्रशासनाकडून केली जात आहे.
प्रतापगडावरील अफझलखानाची ही कबर कालांतराने वादग्रस्त ठरत गेली. दरम्यान, अफझल खानाच्या कबरीच्या आवारात काही खोल्या उभारण्यात आल्या होत्या. या ठिकाणी १९ खोल्या असल्याचंही सांगितलं जातं. या अनधिकृत खोल्यांचं बांधकाम पाडलं जावं, असे आदेश सुप्रीम कोर्टाने दिले होते. त्यानुसार अखेर प्रशासनाकडून कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे. शिवप्रताप दिनाचे औचित्य साधून अफझलखानाच्या कबरीजवळ बांधण्यात आलेलं अनधिकृत बांधकाम पाडण्यात आलं आहे. तिथे कोणालाही प्रवेश नव्हता.
याआधी मनसे अध्यक्ष ऱाज ठाकरे यांनी प्रतापगडाच्या पायथ्याला असणाऱ्या अफझलखानाच्या कबरीबाबत वक्तव्य करताना म्हटलं होतं की,अफझलखानाच्या कबरीचा विस्तार होऊन मशिद झाली आहे. त्या मशिदीसाठी फंडिंग येत आहे. मशिदीसाठी फंडिंग येते, कुठून येतात हे पैसे? असा प्रश्नही त्यांनी विचारला होता. यानंतर पोलिसांच्या विशेष पथकाने प्रतापगडासह अफझलखानाच्या कबरीची पाहणी केली होती.