ध्यास विश्वसार्ह बातमीचा

आषाढी वारीकरीता संत मुक्ताबाई पालखीचे पालकमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत प्रस्थान

जळगाव – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आषाढी वारीसाठी महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या मानाच्या दहा पालख्यांपैकी प्रथम निघणारी श्री संत मुक्ताबाई पालखीचा प्रस्थान सोहळा तापी तीरावरील श्री संत मुक्ताबाई समाधीस्थळ श्रीक्षेत्र कोथळी-मुक्ताईनगर येथे आज जेष्ठ शु. 4, सोमवार, 14 जुन, 2021 रोजी सकाळी 11 वा. जुने मुक्ताबाई मंदिर, कोथळी-मुक्ताईनगर येथे पार पडला. यावेळी राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्यासह मोजके भाविक व मान्यवर उपस्थित होते.

आदिशक्ती संत मुक्ताबाई पालखी सोहळा, मुक्ताईनगर सोबत पंढरपूर येथे श्री. विठ्ठलाचे दर्शनासाठी आषाढी एकादशी वारीस पायी चालत जाण्याची 312 वर्षापासूनची परंपरा आहे. मध्यप्रदेश, खान्देश, विदर्भातील भाविक दिंड्यासह या सोहळ्यात सहभागी होत असतात. 700 किमीचे अंतर 33 दिवसात ऊन, वारा, पाऊस याची तमा न बाळगता पार पाडण्याची पिढ्यानपिढ्यांची परंपरा सुरु आहे. मात्र मागील वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागरीकांच्या हितासाठी शासनाने निर्बंध घातल्याने ही वारी पायी न जाता बसने होत आहे. यावर्षीसुध्दा कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये याकरीता महाराष्ट्र शासनाने संताच्या दहा मानाच्या पालख्यांना परवानगी दिली आहे. यात जळगाव जिल्ह्य़ातील संत मुक्ताबाई संस्थान कोथळी-मुक्ताईनगर येथील संत मुक्ताबाई पालखीचा समावेश आहे. या पालखीचे परंपरेनुसार जेष्ठ शु.4 ला प्रस्थानाचा सोहळा आज जुने मुक्ताबाई मंदिरात सकाळी मोजकेच वारकरी व जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आमदार चंद्रकांत पाटील, माजीमंत्री एकनाथ खडसे, संस्थानचे अध्यक्ष रवींद्र भैय्या पाटील, जिल्हा बॅकेंच्या अध्यक्षा रोहिणीताई खडसे-खेवलकर, पालखी सोहळा प्रमुख हभप. रविंद्र महाराज हरणे, उद्धव जुनारे महाराज, तहसिलदार श्वेता संचेती, पोलीस निरीक्षक रामकृष्ण पवार, नरेंद्र नारखेडे यांच्या उपस्थितीत पार पडला.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या प्रस्थान सोहळ्याचे सोशल मिडीयाद्वारे लाईव्ह प्रसारण करण्यात आले होते. यामुळे भाविकांना हा सोहळा घरबसल्या बघता आला. पालखी प्रस्थानानंतर पालखीचा मुक्काम हा नवीन मुक्ताबाई मंदिरात असणार आहे, याठिकाणी पालखीचे नित्योपचार पूजापाठ करण्यात येतील. शासनाच्या पुढील सुचनांनुसार पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान होईल.
यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी कोरोनापासुन मुक्ती मिळु दे अशी प्रार्थना संत मुक्ताई चरणी केली. माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी मुक्ताई मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांची माहिती सांगून कामे लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी उर्वरित निधी मिळवून देण्याची मागणी पालकमंत्री श्री. पाटील यांचेकडे केली असता मुक्ताई मंदिर परिसरात सुरु असलेल्या कामांसाठी ग्रामविकास, पर्यटन व इतर विभागांकडे पाठपुरावा करुन आवश्यक तो निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!