आळंदी : वृत्तसंस्था
राज्यातील लाखो भाविकांच्या साक्षीने जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या ३३९ व्या आषाढी पायी वारी पालखी सोहळ्याचे आज दि.२८ जून दुपारी देहूनगरीतून श्रीक्षेत्र पंढरपूरकडे प्रस्थान होत आहे.
देहूनगरीत लाखो भाविकभक्तांच्या वारी दिंड्या दाखल झाल्या असून भजन, कीर्तन, हरिपाठ आणि टाळ मृदुंगाच्या गजराने इंद्रायणी घाट परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. दुपारी ३ वाजता टाळ मृदुंग आणि हरिनामाच्या गजरात पालखी सोहळ्याचे भजनी मंडपातून प्रस्थान होणार आहे. मानाच्या दिंड्यांसह मुख्य मंदिर प्रदक्षिणा करून जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा सायंकाळी सहा ते साडेसहा वाजता तुकोबारायांच्या आजोळी (इनामदारसाहेब वाडा) या ठिकाणी पहिल्या मुक्कामासाठी थांबणार आहे.
दरम्यान, संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखीचा प्रस्थान सोहळा कार्यक्रम शनिवारी (दि. २९) दुपारी चारला सुरू होईल. पालखी विणामंडपातून प्रस्थान ठेवत महाद्वारातून बाहेर पडते. प्रदक्षिणा मारून गांधीवाडा मंडप या ठिकाणी मुकामी राहते. वारकऱ्यांच्या गर्दीने अवघी अलंकापुरी फुलून गेली आहे. राज्याच्या विविध भागांतून पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने वारकरी, भाविक दिंड्या आळंदीत दाखल होऊ लागल्या आहेत. या सोहळ्यासाठी अलंकापुरीत लगबग सुरू झाली असून, शनिवारी होणाऱ्या प्रस्थानासाठी आभाळातील ढगांबरोबर वैष्णवांनीदेखील आळंदीत दाटी केली आहे.