रायगड जिल्ह्यातील पूरस्थिती व संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून प्रशासनाला सतर्कतेच्या सूचना
मुंबई, दि. 19 :- रायगड जिल्ह्यात सुरु असलेला मुसळधार पाऊस आणि हवामान विभागाने दिलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी योगेश म्हसे यांना दूरध्वनी करुन त्यांच्याकडून जिल्ह्यातील परिस्थितीचा आढावा घेतला. अतिवृष्टीमुळे जिल्ह्यात निर्माण होणारी पूरस्थिती, दरड कोसळण्याच्या दुर्घटना, त्यामुळे करावे लागणारे नागरिकांचे स्थलांतर लक्षात घेऊन नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्याची कार्यवाही तातडीने आणि शक्यतो दिवसाच पूर्ण करावी, अ,े निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.
कोकणासह राज्यातील अनेक भागात पुढील चार दिवस अतिवृष्टी होण्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. दोन दिवसांपासून सुरु असणाऱ्या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दूरध्वनी करुन आपत्कालिन मदत यंत्रणा चोवीस तास सतर्क ठेवण्याचे निर्देश दिले. नदीकाठच्या गावांतील नागरिकांना सतर्क करावे. गतवर्षांचा अनुभव लक्षात घेता बचाव व मदतकार्य रात्रीच्या वेळी करण्यात अडचणी येतात. त्यामुळे पुरामुळे बाधित नागरिकांचे स्थलांतर तातडीने करावे, शक्यतो ही कार्यवाही दिवसा पूर्ण होईल, याची दक्षता घ्यावी. आपत्तीग्रस्त नागरिकांना जीवनावश्यक गोष्टींचा पुरवठा करावा. कोणत्याही परिस्थितीत नागरिकांची गैरसोय होणार नाही, याची प्रशासनाने खबरदारी घ्यावी अशा सूचना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जिल्हा प्रशासनाला दिल्या.