नागपूर : वृत्तसंस्था
राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आता पासून राज्यातील सर्वच नेते आपापल्या पद्धतीने गणिते मांडण्यास सुरुवात झाली असतांना भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांची शुक्रवारी संघाच्या पदाधिकाऱ्यांसोबत समन्वय बैठक झाली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीतील पराभवासह आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने चर्चा करण्यात आली. अजित पवार यांचा लोकसभेला फारसा फायदा झाला नाही, पण त्यानंतरही महायुती म्हणून त्यांच्यासोबतच विधानसभेला सामोरे जाण्याच्या मुद्यावर यावेळी उहापोह करण्यात आला, असा दावा एका मराठी वृत्तवाहिनीने केला आहे.
दरम्यान लोकसभा निवडणुकीत अनेक खासदारांना संधी देण्यात आली. मात्र, त्यातील नितीन गडकरी आणि रक्षा खडसे सोडले तर अनेकांना आपला मतदारसंघ पुन्हा मिळवता आला नाही. निवडून आलेल्या 9 पैकी 7 खासदारांना पहिल्यांदा संधी मिळाली आहे. यावरुन आगामी विधानसभा निवडणुकीत भाजप अनेक विद्यमान आमदारांची तिकिटं कापून त्यांच्या जागी नव्यांना संधी देण्याची शक्यता वर्तवली आहे.
देवेंद्र फडणवीस म्हणाले की, 2019 नंतर महाविकास आघाडी सरकार सत्तेत आले. तेव्हा भाजप सर्वात मोठा पक्ष असतानाही एकट्या भाजपच्या मतांची टक्केवारी भाजप स्वबळावर सत्तेवर येऊ शकेल अशी नव्हती म्हणून आधी एकनाथ शिंदे यांना सोबत घेण्यात आले. तरी दोघांची मताची टक्केवारी लोकसभा निवडणुकीत आणि पुढे विधानसभा निवडणुकीत आधीसारखं यश मिळवून देईल अशी नसल्याने अजित पवार यांना सोबत घेण्यात आले. लोकसभा निवडणुकीत भाजपचे मत एकनाथ शिंदे यांना 89% ट्रान्सफर झाले, तर शिंदेंचे वोटही 88% पर्यंत भाजपला ट्रान्सफर झाले आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी म्हटल्याचे एबीपी माझा या मराठी वृत्तवाहिनीने दिलेल्या वृत्तात म्हटले आहे.