नागपूर ; वृत्तसंस्था
रामनगर चौकात भारतीय जनता पक्षाच्यावतीने माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याबद्दल आक्षेपार्ह होर्डिंग लावल्याबद्दल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा शरदचंद्र पवार गट आक्रमक झाला आहे. या प्रकाराबद्दल पक्षाच्यावतीने पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित होर्डिंग एजन्सीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर पोलिसांनी हे होर्डिंग चौकातून काढले.
वाझे खोटे बोलत असेल तर माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर आरोप करण्यापेक्षा नार्को टेस्टसाठी सामोरे गेले पाहिजे. केवळ आरोप करू नये, असा टोला भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अनिल देशमुख यांना लगावला. ‘वाझे खोटे बोलत असेल तर जनतेला नार्को टेस्टमधून कळू द्या. केवळ आरोप-प्रत्यारोप करू नये. चौकशी मागा आणि त्याला समोर जा’, असा सल्ला बावनकुळेंनी दिला.
भारतीय जनता युवा मोर्चा नागपूरच्यावतीने रामनगर चौकात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे छायाचित्र असलेले होर्डिंग लावण्यात आले आहे. यावर फडणवीस यांच्या छायाचित्रावर ‘विकास वृत्ती’, तर देशमुख यांच्या छायाचित्रावर ‘वसुली बुद्धी’ असे लिहित त्यांना जेलच्या आड दाखवण्यात आले आहे. या होर्डिंगवर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष शैलेंद्र तिवारी यांनी तीव्र आक्षेप घेत अंबाझरी पोलिस ठाण्यात तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत पोलिसांनी संबंधित जाहिरात एजन्सी व भाजपच्या पदाधिकाऱ्यांच्या विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चौकात लावलेले हे होर्डिंग काढून टाकले. दरम्यान, भाजयुमोने अशा पद्धतीने होर्डिंग लावण्यापेक्षा हिंमत असेल तर संबंधित पदाधिकाऱ्याचे नाव व छायाचित्रासह होर्डिंग लावावे. आम्ही शरद पवार गटाचे पदाधिकारी असून जशास तसे उत्तर देऊ, असा इशाराही तिवारी यांनी यावेळी दिला आहे.