ध्यास विश्वसार्ह बातमीचा

नाराजीनाट्य.. फडणवीसांच्या भेटीला लागल्या रांगा

मुंबई वृत्तसंस्था

भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुकांसाठी पहिली यादी रविवारी दुपारी जाहीर झाली असून अनेक आमदारांना मोठा धक्का बसला आहे. यामुळे मोठे नाराजीनाट्य सुरु आहे. तर काही जण प्रतीक्षेत आहेत. मुंबईत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निवासस्थान असलेल्या ‘सागर’ बंगल्यावर हजेरी लावली. मुरजी पटेल, भारती लव्हेकर, भीमराव तापकीर, बबनराव पाचपुते यांनी फडणवीसांची भेट घेतली. तर आमदार सत्यजित तांबे ‘मेघदूत’ बंगल्यावर गेले होते.

अंधेरी पूर्व येथून इच्छुक असलेले मुरजी पटेल देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला आले. भाजपकडून अंधेरी पूर्व येथे पोटनिवडणुकीत मुरजी पटेल यांनी अर्ज भरला होता. मात्र अर्ज भरल्यानंतर पक्षाने सांगितल्यामुळे त्यांनी माघार घेतली होती. त्यानंतर शिवसेना ठाकरे गटाच्या ऋतुजा लटके या ठिकाणी आमदारपदी निवडून आल्या. लोकसभा निवडणुकीत या ठिकाणी महायुतीला मताधिक्य मिळाले होते. त्यामुळे पटेलांच्या आशा वाढल्या आहेत. भाजपच्या वर्सोव्याच्या आमदार भारती लव्हेकरही सागर बंगल्यावर दाखल झाल्या. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. मुंबईतील आमदारांच्या यादीत लव्हेकर यांचे नाव नाही. उमेदवारीसाठी लव्हेकर यांनी सागर बंगल्यावर धाव घेतल्याचे दिसते.

तसेच बबनराव पाचपुते हेसुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीसाठी सागर निवासस्थानी दाखल झाले. पत्नी प्रतिभा पाचपुते यांच्यासोबत बबनराव यांनी सागर निवासस्थान गाठले. प्रतिभा पाचपुते यांना भाजपकडून उमेदवारी जाहीर झाली. मात्र पत्नीऐवजी मुलगा विक्रमसिंह पाचपुते यांना उमेदवारी मिळावी म्हणून दोघेही आग्रही आहेत. विशेष म्हणजे नाशिक पदवीधर मतदारसंघाचे आमदार सत्यजित तांबेही फडणवीस यांच्या भेटीला आले. त्यांचे कार्यालय असलेल्या मेघदूत बंगल्यावर तांबे दाखल झाले. मात्र भंडारदरा धरण संदर्भातील काही कामे असल्याने फडणवीसांची भेट घेतली असल्याचे तांबेंचे म्हणणे आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!