ध्यास विश्वसार्ह बातमीचा

भाजप महिला आघाडीने मोदींना रक्ताने लिहिलं पत्र

फडणवीसांनाच मुख्यमंत्री करण्याची मागणी

छ.संभाजीनगर वृत्तसंस्था 

महाराष्ट्रात महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं असून भाजपा १३२ जागा मिळवत सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. मात्र आता मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.  अजित पवार या शर्यतीत नाहीत कारण त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला आमची काही हरकत नाही असं म्हटलं आहे. मात्र एकनाथ शिंदेंनी तसं जाहीर केलेलं नाही. एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले पाहिजेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात बिहार पॅटर्न राबवा अशीही अपेक्षा व्यक्त केली आहे. दरम्यान महायुतीचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होतील असेच संकेत आहेत. दुसरीकडे भाजपाच्या महिला आघाडीने पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्ताने पत्र लिहून देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करण्याची मागणी केली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी मागणी राज्यभरातून भाजपा कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. छ.संभाजीनगरमध्ये देखील देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत यासाठी महिला आघाडीच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रक्ताने पत्र लिहिण्यात आलं आहे. गेली पाच वर्षे देवेंद्र फडणवीस यांनी पक्षासाठी अहोरात्र काम केलं आहे. त्यांच्यावर प्रचंड टीका झाली मात्र त्यांनी कामामध्ये कुठलीच कसर सोडली नाही. यामुळे देवेंद्र फडणवीस यांना राज्याचे मुख्यमंत्री करावं अशी मागणी छत्रपती संभाजीनगरच्या भाजपा महिला पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

“महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका झाल्या आणि सत्तास्थापनेचा दिवस आला आहे. आमच्या देवाभाऊंनी पाच वर्षांच्या कालावधीत जो संघर्ष केला आहे, जनतेसाठी अविरत काम केलं आहे. लोकांनी त्यांना त्रासही दिला तरीही त्यांनी त्याचा विचार न करता जनहिताचं काम अविरत सुरु ठेवलं. महाराष्ट्रात त्यांनी महायुतीलाही मोठं यश मिळवून दाखवलं. महायुतीच्या ज्या जागा निवडून आल्या आहेत त्या देवाभाऊंचा सिंहाचा वाटा आहे. त्यामुळे आमच्या लाडक्या बहिणींची अपेक्षा आहे की देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री करावं म्हणून मी माझ्या रक्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना पत्रलिहिलं आहे.” असं महिला आघाडीच्या मनिषा मुंडे यांनी माध्यमांना सांगितलं.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!