मुंबई: आज सोमवारपासून राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सत्ताधारी आणि विरोधाकांमध्ये जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली आहे. विदर्भातील वैधानिक मंडळावरून माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवारांवर चांगलेच संतापले. वैधानिक विकास महामंडळाची पुर्नस्थापना का केली नाही? ७२ दिवस झाले तरी सरकार का काही करत नाही? असा प्रश्न माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी उपस्थित केला. यावर अजित पवारांनी दिलेल्या उत्तरावरुन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस चांगलेच संतापले. ‘अजित दादा तुम्ही विदर्भाच्या जनतेवर अन्याय करत आहात. विदर्भाची जनता तुम्हाला कधीच माफ करणार नाही, अजित पवारांचा मी निषेध करतो’ अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी संताप व्यक्त केला.
“विकास महामंडळ आम्ही स्थापन करु. महामंडळ स्थापन करण्याबाबत ठरले आहे. पण मंत्रिमंडळाने एक निर्णय घेतला आहे ज्या दिवशी १२ आमदारांची नावे जाहीर करतील त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी वैधनिक विकास मंडळ घोषित करु असे म्हटले. यावरून विरोधकांनी गदारोळ घालणे सुरु केले.
१२ आमदारांसाठी मराठवाड़ा, विदर्भाला ओलीस ठेवले आहे. किती राजकारण करत आहात ? विदर्भ, मराठवड्याचे कवच आहेत, ही जर वैधानिक विकास मांडले नसती तर कसे लुटून नेले असते हे वारंवार सभागृहात दिसले आहे. या सभागृहात तर अजित पवारांना वैधानिक विकास मांडले आमच्या हाताशी होती म्हणून तुम्हाला बजेट मागे घ्यावे लागले होते. राज्य सरकार आणि राज्यपाल यांच्यात वाद असेल तो तुमचा आणि राज्यपालांचा विषय आहे. महाराष्ट्रातील जनतेला त्याच्याशी काय देणं घेणं आहे? राज्यपाल कोणत्याही पक्षाचे नाही. त्यामुळे अजित पवारांना माझी हात जोडून विनंती आहे की, असं म्हणू नका अन्यथा विदर्भ, मराठवाड्यातील जनता माफ करणार नाही. तुम्ही दिलं नाही तर संघर्ष करुन मिळवू…ही भीक नाहीये. आम्ही भिकारी नाही आहोत, ते आमच्या हक्काचं आहे. घेतल्याशिवाय आम्ही राहणार नाही. वैधानिक विकास मंडळं करा अथवा नको पण संविधानाने जे दिलं आहे ते मिळवल्याशिवाय राहणार नाही. म्हणून अजित पवारांच्या वक्तव्याचा निषेध करतो,” असं म्हणत फडणवीसांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.