मुंबई : वृत्तसंस्था
महायुती सरकारचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज वयाच्या 56 व्या वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त राजकीय, सामाजिक आणि सर्वसामान्य जनतेकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. विशेष म्हणजे, नेहमी वैचारिक मतभेद असलेले आणि परस्परांवर टीका करणारे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी देखील या निमित्ताने फडणवीस यांची मुक्तकंठाने स्तुती केली आहे. देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे. त्यांना पाहून मला माझा मुख्यमंत्रीपदाचा पहिला कार्यकाळ आठवतो, अशा शब्दांत शरद पवारांनी देवेंद्र फडणवीसांचे कौतुक केले आहे.
गिरीश महाजन यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या ‘महाराष्ट्र नायक’ या पुस्तकात शरद पवारांनी फडणवीस यांच्याविषयी विशेष लेख लिहिला असून, त्यात त्यांनी त्यांच्या कार्यशैलीचे, नेतृत्वगुणांचे आणि धैर्याचे मन:पूर्वक कौतुक केले आहे.
शरद पवार म्हणतात, दोन विभिन्न विचारधारेचे प्रवाह समांतर वाहत असताना त्यांनी एकमेकांविषयी काय बोलावे! अन् बोलायचंच म्हटले तर दोन्ही प्रवाहांची गती सारखी हवी. मी माझा वेग अजूनही अबाधित ठेवला आहे आणि देवेंद्र फडणवीसांच्या कार्याची गती अफाट आहे, हे कसे काय नाकारता येईल? देवेंद्र फडणवीस यांच्या कामाचा झपाटा आणि उरक पाहिला की, मला ‘मी पहिल्यांदा मुख्यमंत्री झालो’ तो कार्यकाळ आठवतो. देवेंद्र फडणवीसांची देखील ही गती ते माझ्या वयाचे होईपर्यंत राहो आणि कालचक्रमानाने ती वृद्धिंगत होत राहो, असे अभिष्टचिंतन त्यांच्या वाढदिवसानिमित्त करतो.
शरद पवार यांनी म्हटले की, क्रियाशील राहण्याकरीता प्रकृती शिडशिडीत असावी, असे स्थूलमानाने म्हटले जाते. पण आम्हा दोघांतील साम्य लक्षात घेता आमच्या कार्यक्षमतेत स्थूलपणा कधी आडवा आला नाही. विनोदाचा भाग सोडला तर त्यांचे कष्ट पाहून ‘ते थकत कसे नाहीत?’ असा प्रश्न मलाही पडतो. ही त्यांच्या कार्याची पोचपावती आहे. देवेंद्र फडणवीसांना राजकारणाचे बाळकडू जरी घरातून मिळाले तरी वडिलांच्या अकाली निधनाच्या धक्क्यातून सावरणे, उभे राहणे आणि नेटाने पुढे जाणे हे आव्हानात्मक होते. त्यामुळे आजपर्यंतच्या यशस्वी वाटचालीचे श्रेय केवळ त्यांचे आहे.
देवेंद्र कायद्याचे पदवीधर असल्याने ते पट्टीचे हजरजबाबी, संवादकुशल आहेत. वागण्यात आणि बोलण्यात कमालीचे तारतम्य ही त्यांची जमेची बाजू आहे. या गुणांच्या आणि उपजत बुद्धिचातुर्याच्या बळावर त्यांनी सत्तेत नसताना देखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला. तसेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून त्यांनी बजावलेली कामगिरी खरोखरच वाखाणण्याजोगी होती. या कामगिरीचे फलित म्हणूनच त्यांच्या गळ्यात अगदी तरुण वयात मुख्यमंत्रिपदाची माळ पडली. भाजपाच्या वरिष्ठ नेतृत्वाने दाखवलेला विश्वास त्यांनी सार्थ ठरवला. त्यांनी केलेल्या कामांचा ऊहापोह कॉफी टेबलबुकमध्ये होईलच. परंतु, मी त्यांच्याकडे विविध विषयांची उत्तम जाण असणारा, प्रशासनावरील मजबूत पकड असणारा आणि आधुनिकतेची कास धरणारा नेता म्हणून पाहतो, असेही पवार यांनी म्हटले आहे.