ध्यास विश्वसार्ह बातमीचा

धोत्रीच्या गोकुळ शुगरने दिला ऊसाला २१२१ रुपये दर

तालुका प्रतिनिधी

अक्कलकोट, दि.१० : मागील वर्षी गाळप केलेल्या कार्य क्षेत्रातील उसाला धोत्री येथील गोकुळ शुगर इंडस्ट्रीजने प्रति टन २१२१ रुपये दर देण्याची घोषणा कारखान्याचे चेअरमन दत्ता शिंदे यांनी केली. दिवाळीपूर्वी उर्वरित रक्कम ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे.

आगामी गळीत हंगामाच्या पार्श्वभूमीवर ऊस उत्पादक, शेतकरी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची संयुक्त बैठक कारखाना स्थळावर बोलावण्यात आली होती. या बैठकीत त्यांनी ही घोषणा केली. कार्यक्षेत्रातील उसाचे क्षेत्र, नवीन लागवड, याचा त्यांनी आढावा घेतला. यंदा कार्यक्षेत्रातील उसाची लागवड वाढली आहे. त्यामुळे १५ ऑक्टोबर पासून कारखाना गळीत हंगामासाठी सज्ज करण्यात आला आहे.

गतवर्षी ऊस पुरवठा केलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी २० किलो साखर प्रति किलो २० रुपये दराने कारखान्याच्या विभागीय कार्यालयात वितरित करण्यात येणार आहे. मागील वर्षाच्या उसाची एफआरपीची रक्कम प्रति टन २
हजार रुपये प्रमाणे यापूर्वीच ऊस पुरवठादार शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात आली आहे. उर्वरित रक्कम तातडीने शेतकऱ्यांना अदा केली जाणार आहे, अशी माहिती त्यांनी दिली.

 

बैठकीला कारखान्याचे संस्थापक बलभीम शिंदे, त्यांच्या सुविद्य पत्नी शोभा शिंदे, चेअरमन दत्ता शिंदे यांच्या सुविद्य पत्नी प्रीती शिंदे, कार्यकारी संचालक कपिल शिंदे, एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर विशाल शिंदे, तुळजाभवानी कारखान्याचे चेअरमन सुनील चव्हाण,संचालक गणपत शिंदे, कुसुम शिंदे, माजी सभापती कल्याणराव पाटील, माजी उपसभापती स्वामीराव पाटील, निवृत्त मुख्याध्यापक शिवाजीराव पाटील, उद्योजक अभिनंदन गांधी, लाला राठोड, सागर संतांनी, प्रदीप गायकवाड, मोट्याळचे सरपंच कार्तिक पाटील, बाबासाहेब पाटील,जनरल मॅनेजर प्रदीप पवार, अभिजीत गुंड, शेती अधिकारी शेंडगे जहागीरदार यांची प्रमुख उपस्थिती होती.

१० लाख टन गाळपाचे उद्दिष्ट

गोकुळ शुगरच्या परिसरात वाढलेले उसाचे क्षेत्र आणि कारखान्याची वाढीव गाळप क्षमता याचा विचार करता यंदाच्या गळीत हंगामात कारखान्याने दहा लाख मॅट्रिक टन उस गाळपाचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आल्याची माहिती चेअरमन दत्ता शिंदे यांनी दिली. याच वेळी कारखान्याच्या कामगारांना एक महिन्याचा पगार बक्षीस म्हणून तर एक महिन्याचा पगार बोनस असा दोन महिन्याचा पगार देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!