ध्यास विश्वसार्ह बातमीचा

दहावीचा भूगोल पेपर ‘फुटला’ का? सांगोल्यातील स्ट्राँग रूम फोडून ५० प्रश्नपत्रिका चोरी !

सोलापूर : वृत्तसंस्था

दहावी बोर्डाच्या उद्याच्या भूगोल विषयाच्या पेपरबाबत मोठा गोंधळ निर्माण झाला असून सांगोला येथील एका परीक्षा केंद्रातून प्रश्नपत्रिकांचा संच चोरीला गेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पेपरच्या गोपनीयतेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून संबंधित पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका संच पुरवला जाणार, याबाबत शिक्षण मंडळाने अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालक आणि शिक्षकांचे लक्ष आता मंडळाच्या पुढील भूमिकेकडे लागले आहे.

राज्यात सध्या दहावीच्या परीक्षा सुरू असून १८ मार्च रोजी भूगोल विषयाचा पेपर नियोजित होता. मात्र, त्याच्या आदल्या दिवशीच सांगोला शहरातील विद्यामंदिर परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूम फोडून भूगोल विषयाच्या ५० प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना समोर आली. मंगळवारी सकाळी सुमारे ८.३० वाजता शिक्षण विभागाचे अधिकारी आणि कस्टोडियन उरलेल्या प्रश्नपत्रिका पोस्टाद्वारे पाठवण्यासाठी आले असता स्ट्राँग रूमचे कुलूप तुटलेले आढळले. त्यानंतर ही बाब उघडकीस आली.

या घटनेची माहिती मिळताच पोलिस प्रशासनाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून तपास सुरू केला असून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत तातडीच्या बैठका घेण्यात आल्या. जिल्हा प्रशासनानेही या प्रकरणाची गंभीर दखल घेत आवश्यक सूचना दिल्या आहेत.

कुलूप तोडून कपाटातील प्रश्नपत्रिका लंपास
मिळालेल्या माहितीनुसार, परीक्षा केंद्रातील स्ट्राँग रूममध्ये प्रश्नपत्रिका सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. अज्ञात चोरट्यांनी सोमवारी रात्रीच्या सुमारास कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि कपाटात ठेवलेल्या भूगोल विषयाच्या प्रश्नपत्रिका पळवून नेल्या. सकाळी ही बाब लक्षात येताच केंद्रावर एकच खळबळ उडाली.

सीसीटीव्ही बंद; सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
घटनेतील सर्वात धक्कादायक बाब म्हणजे स्ट्राँग रूमसमोरील सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे चोरीचे कोणतेही दृश्य उपलब्ध नाही. ज्या ठिकाणी २४ तास कडक बंदोबस्त अपेक्षित होता, तिथेच ही घटना घडल्याने सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

कर्तव्यावरचा कर्मचारी कुठे होता?
घटनेच्या वेळी ड्युटीवर असलेला कर्मचारी नेमका कुठे होता, याबाबतही प्रश्न उपस्थित होत आहेत. ही चोरी पूर्वनियोजित असल्याचा संशय व्यक्त केला जात असून यामागे आतल्या व्यक्तींचा हात असण्याची शक्यता नाकारता येत नाही.

विद्यार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण
दरम्यान, या घटनेमुळे उद्याच्या पेपरबाबत विद्यार्थ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. पेपर होणार की पुढे ढकलला जाणार, याबाबत स्पष्टता नसल्याने विद्यार्थी आणि पालक चिंतेत आहेत. शिक्षण मंडळाने लवकरात लवकर निर्णय घेऊन विद्यार्थ्यांमधील संभ्रम दूर करावा, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!