ध्यास विश्वसार्ह बातमीचा

शिवरायांच्या शौर्यगाथाना मिळणार डिजिटल तंत्रज्ञानाची जोड !

पुणे : वृत्तसंस्था

छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यगाथा, ऐतिहासिक दस्तावेज, कलाकृती, चित्रे आणि रायगड किल्ल्याबद्दलची माहिती आता डिजिटल तंत्रज्ञानाच्या आधारे शिवभक्तांना पाहायला मिळणार आहे. रायगडच्या ८० एकर परिसरात आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने संग्रहालय आणि विविध आयटी सेवेवर आधारित प्रकल्प उभारण्यात येणार आहेत. यामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स (एआय), एआर- व्हीआर, क्यूआर कोड अशा विविध तंत्रज्ञानाचा वापर करण्यात येणार आहे.

पुण्यातील सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सीडॅक) आणि रायगड विकास प्राधिकरण (आरडीए) यांच्यात या तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पासंदर्भात शुक्रवारी सामंजस्य करार करण्यात आला. आरडीएचे अध्यक्ष छत्रपती संभाजीराजे, आरडीएचे सीईओ महेश नामडे, सीडॅकचे कार्यकारी संचालक कर्नल ए. के. नाथ (निवृत्त) यांच्या उपस्थितीत या करारावर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.

याबाबत माहिती देताना ए. के. नाथ म्हणाले, सीडॅक या संस्थेकडून पर्यटन स्थळे, किल्ल्यांच्या परिसरातील कामांमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यासाठी सहाय्य केले जात आहे. रायगड किल्ल्याचा इतिहास जतन करण्यासाठी याला डिजिटल तंत्रज्ञानाची जोड दिली जाणार आहे. किल्ल्यातील ऐतिहासिक कागदपत्रे, कलाकृती, चित्रे आणि रायगड किल्ल्याबद्दलची महत्त्वपूर्ण माहिती ऑनलाइन पोर्टलच्या माध्यमातून दिली जाणार आहे. मोबाइल टुरिस्ट गाइड यासारखे किल्ल्यावर येणाऱ्या पर्यटकांना, अभ्यासकांना सर्वसमावेशक माहिती आणि नेव्हिगेशन मार्गदर्शन देणारे एक स्मार्ट मार्गदर्शक मोबाइल अॅप्लिकेशन विकसित केले जाणार आहे. याचा वापर मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेत करता येईल.

संभाजीराजे म्हणाले, राज्यात अमलात येणारा हा पहिलाच प्रकल्प आहे. राज्यासह देशभरातील पर्यटनाला या माध्यमातून चालना मिळेल. सीडॅक या संस्थेच्या मदतीने रायगडला डिजिटल तंत्रज्ञानाची झळाळी प्राप्त होणार आहे. येत्या दीड-दोन वर्षांत काम पूर्ण होईल. याकरिता राज्य शासनाकडून ४ कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे. या कामासाठी इतिहासतज्ज्ञ, सल्लागार नेमण्यात आले आहेत. या कामाचा फायदा संशोधन करण्यासाठी येणाऱ्या शिवभक्तांना होणार आहे. काम सुरू करण्याआधी सीडॅकच्या कर्मचाऱ्यांकडून या परिसराचा अभ्यास करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!