ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पोलीस तपासात खुलासा : खा.रवींद्र वायकरांचे अडचणीत वाढ

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघाची लोकसभा निवडणुकीच्या निकालात जोरदार चर्चा झाली होती. या मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार रवींद्र वायकर हे निवडून आले आहेत. मात्र, त्यांच्या विरोधातील उमेदवार अमोल कीर्तिकर यांनी मतमोजणीवर आक्षेप घेतला आहे. या प्रकरणी वनराई पोलिसांनी वायकर यांचे मेहुणे मंगेश पंडीलकर आणि निवडणूक आयोगाचा एनकोर ऑपरेटर दिनेश गुरव यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तपास सुरू असताना खळबळजनक माहिती समोर आली आहे. पंडीलकर ईव्हीएम यंत्राशी जोडलेला मोबाइल फोन वापरत असल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी त्यानुसार इतर उमेदवारांचे जबाब नोंदवले असून, लवकरच याप्रकरणी अटक वॉरंट जारी करण्यात येणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार मंगेश पंडीलकर ज्या फोनवर बोलत होता, तो फोन ईव्हीएम यंत्राला जोडलेला होता. ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यासाठी एक ओटीपी जनरेट होतो. हा ओटीपी ज्या मोबाईल फोनवर आला होता, तोच फोन मंगेश पंडीलकर याच्या हातात असल्याची धक्कादायक माहिती आता तपासात समोर आली आहे. गोरेगावमधील नेस्को मतमोजणी केंद्रावर याच मोबाईल फोनचा वापर करुन 4 जून रोजी सकाळी ईव्हीएम मशीन अनलॉक करण्यात आल्या होत्या.

वनराई पोलिसांनी याप्रकरणी मंगेश पडीलकर आणि दिनेश गुरव यांना नोटीस देखील पाठवली असल्याची माहिती समोर आली आहे. त्यानुसार कोणत्याही क्षणी अटक होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तसेच पोलिसांनी मंगेश पडीलकर याने वापरलेला फोन फॉरेन्सिक तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवला आहे. या फोनमधील डाटा आणि फिंगरप्रिंटची तपासणी केली जाणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!