ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अक्कलकोट शहरात बाप्पांच्या आगमनात खड्ड्यांचे विघ्न

मंडळांच्या समस्येबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

बाप्पांच्या आगमनाला अवघे चार दिवस शिल्लक राहिले आहेत. या पार्श्वभूमीवर अक्कलकोट नगर परिषद हद्दीतील विविध मार्गावर येणारे अडथळे दूर करावेत, अशी मागणी माजी उपनगराध्यक्ष महेश हिंडोळे यांच्या शिष्ट मंडळाने मुख्याधिकारी रमाकांत डाके यांच्याकडे केली आहे.दरवर्षी गणेशोत्सवामध्ये शांतता बैठकीत चर्चा केली जाते.परंतु त्याची अंमलबजावणी काटेकोरपणे केली जात नाही.

यावर्षी तसे न होता मंडळाला येणाऱ्या अडचणी दूर कराव्यात, अशी मागणी आतापासूनच केली जात आहे.या पार्श्वभूमीवर मुख्याधिकाऱ्यांनी मिरवणूक मार्गाची प्रत्यक्ष पाहणी करून सर्व खड्डे बुजवुन घ्यावेत, चुकीचे गतीरोधक काढून टाकावेत, मिरवणूक मार्गात येणाऱ्या झाड्यांच्या फांद्य तोडावेत,मिरवणूकीत अडथळा ठरणारे केबल वायर हटवावेत,अडथळा ठरणारे सर्व प्रकारचे अतिक्रमण हटवावे,देशमुख गल्ली ते दावल बँड मार्गावरील अतिक्रमण काढून रस्ता मोकळा करावा, देशमुख गल्ली ते दावल बँड मार्गावरील सर्व स्पीड ब्रेकर काढून रस्ता सुरळीत करावा, जय जवान गल्ली (जिरोळे घरासमोरील) लाईट पोल शिफ्ट करून अडचण दूर करावी,राम गल्ली येथील टेनिफोन खांब व बंद हातपंप काढण्यासह शहरातील सर्व गणेश मंडळांच्या जागेची स्वच्छता करून उत्सवातील सर्व अडथळे दूर करण्याबाबत तात्काळ कार्यवाही व्हावी अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अक्कलकोटच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे.या परंपरेला कुठेही अडचण न येता,प्रशासनाने सहकार्य करावे, हिंडोळे यांनी सांगितले.यावेळी दयानंद बिडवे,विजयकुमार मलंग, रोहित सुतार आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!