मराठी भाषा बोलताना, लिहिताना रोजच्या वापरातल्या अनेक शब्दांचे लेखन अनेकांकडून अनेकदा अयोग्य पद्धतीने केले जात असल्याचे दिसते. शुद्धलेखनाचा प्रचार आणि प्रसार हेच जीवनध्येय मानून त्यासाठी शेवटच्या श्वासापर्यंतचा क्षण अन् क्षण वेचणारे शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे १४ मे २०२० रोजी कर्करोगामुळे निधन झाले. हमखास चुकीच्या पद्धतीने लिहिल्या जाणाऱ्या काही शब्दांबद्दल सांगणारा अरुण फडके यांच्या लेखातील काही महत्त्वाचा भाग डॉक्टर विद्याधर देसाई यांनी सामायिक केला आहे. त्यामधून..
संधी हा प्रकार विशेषतः संस्कृत भाषेत वापरला जातो. परंतु संस्कृतमध्ये तयार झालेले कितीतरी शब्द आपण मराठीत जसेच्या तसे वापरतो. संधीक्रियांमधून जेवढे बरोबर तेवढेच चुकीचे शब्दही तयार होतात आणि आपण ते सर्रास तसेच वापरतो.
असेच काही शब्द पाहू या. डावीकडे लिहिलेले म्हणजे – चिन्हाच्या आधी लिहिलेले शब्द योग्य आहेत. चुकीचे शब्द उजवीकडे लिहिले असून, त्यांच्यापुढे ‘x’ हे चिन्ह दिले आहे.
मथितार्थ – मतितार्थ x
मध्यांतर – मध्यंतर x
दीपावली – दिपावली x
शुभाशीर्वाद – शुभाशिर्वाद x
रवींद्र – रविंद्र x
हृषीकेश – ऋषिकेश x
सर्वोत्कृष्ट – सर्वोत्कृष्ठ x
अल्पोपाहार – अल्पोपहार x
सोज्ज्वळ – सोज्वळ x
कोट्यधीश – कोट्याधीश x
कोट्यवधी – कोट्यावधी x
त्र्यंबक – त्रिंबक x
पृथक्करण – पृथःकरण x
धिक्कार – धिःकार x
पश्चात्ताप – पश्चाताप x
तत्त्व – तत्व x
महत्त्व – महत्व x
व्यक्तिमत्त्व – व्यक्तिमत्व x
उद्ध्वस्त – उध्वस्त x
मुक्तच्छंद – मुक्तछंद x
रंगच्छटा – रंगछटा x
पितृच्छाया – पितृछाया x
मातृच्छाया – मातृछाया x
चतुर्मास – चातुर्मास x
दुर्भिक्ष – दुर्भिक्ष्य x
निर्घृण – निघृण x
निर्भर्त्सना – निर्भत्सना x
चतुरस्र – चतुरस्त्र x
दुरन्वय – दुरान्वय x
पुनःप्रक्षेपण – पुनर्प्रक्षेपण x
मनःस्थिती – मनस्थिती x
पुनःस्थापना – पुनर्स्थापना x
यशःशिखर – यशोशिखर x
मनस्ताप – मनःस्ताप x
हे किंवा असे काही सर्वसाधारण आणि नेहमीच्या वापरातले शब्द आपण हमखास चुकीचे उच्चारतो आणि लिहितोही. असेच इतर काही शब्दही आहेत, जे चकित करणारे आहेत. ते त्यांच्या स्पष्टीकरणासह पाहू या…
सार्वकालिक, सर्वकालीन, तत्काळ – सर्वकालिक, सार्वकालीन, तात्काळ
सार्वकालिक, सर्वकालीन, तत्काळ हे योग्य शब्द आहेत आणि सर्वकालिक, सार्वकालीन, तात्काळ हे चुकीच्या पद्धतीने लिहिलेले शब्द आहेत. सर्वकाल ह्या शब्दाला इक हा प्रत्यय लागताना पहिल्या अक्षराची वृद्धी होऊन सार्वकालिक असा शब्द तयार होतो. सर्वकाल ह्या शब्दाला ईन हा प्रत्यय लागून सर्वकालीन असा शब्द तयार होतो. ईन हा प्रत्यय पहिल्या अक्षराची वृद्धी करत नसल्याने सार्वकालीन हे रूप अयोग्य. ह्याचप्रमाणे, तत्काल ह्या शब्दापासून तात्कालिक आणि तत्कालीन असे दोन शब्द तयार होतात. सर्वकालीन आणि तत्कालीन ह्या दोन शब्दांमधील इकार दीर्घ आहे हे लक्षात ठेवावे. तत्काल ह्या शब्दातील ल चा ळ करून (जसे कुल – कुळ, मल – मळ) मराठीने या शब्दाचे तद्भव रूप तत्काळ असे केले आहे. तात्काल किंवा तात्काळ हे दोन्ही शब्द अयोग्य होत. याचप्रमाणे –
साहाय्य, साहाय्यक (योग्य) – सहाय्य, सहाय्यक x
जाज्वल्य – जाज्ज्वल्य x
तज्ज्ञ – तज्ञ x
अनावृत – अनावृत्त x
षष्ट्यब्दीपूर्ती – षष्ठ्यब्दिपूर्ती x
अल्पसंख्याक, बहुसंख्याक (योग्य) – अल्पसंख्यांक, बहुसंख्यांक x
उद्योगीकरण, औद्योगिकीकरण, भगवीकरण (योग्य) – औद्योगीकरण, भगवेकरण x
महाराष्ट्रीय – महाराष्ट्रीयन x
सर्जन, सर्जनशील, सर्जनशीलता (योग्य) – सृजन, सृजनशील, सृजनशीलता x
प्रथितयश – प्रतिथयश x
उद्धृत – उधृत x
– अरुण फडके