ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डोंबिवली पुन्हा हादरली : दोन केमिकल कंपन्यामध्ये भीषण आग

मुंबई : वृत्तसंस्था

काही दिवसांपूर्वी झालेला भीषण स्फोट आणि त्यानंतरच्या आगीच्या आठवणी ताज्या असतानाच डोंबिवली पुन्हा एकदा हादरली आहे. इथल्या एमआयडीसी फेज-२ मधील दोन केमिकल कंपन्यांमध्ये आज मोठी आग लागली आहे. या घटनेमुळं एमआयडीसी परिसरात प्रचंड घबराट उडाली आहे. इंडो अमाईन्स आणि मालदे नावाच्या केमिकल कंपन्यांमध्ये ही आग लागल्याची प्राथमिक माहिती आहे. आगीच्या ठिकाणाहून स्फोटांचे आवाज आल्याचंही बोललं जात आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या सात ते आठ गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आहेत. आग आटोक्यात आणण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.

आग लागण्याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मात्र, आगीचे लोळ आणि धुराचे लोट सर्वत्र दिसत आहेत. त्यामुळं घबराटीचं वातावरण आहे. जीवितहानीचं वृत्त अद्याप नसलं तरी आगीत काही लोक अडकले असण्याची भीती व्यक्त होत आहे. पंधरवड्यापूर्वीच डोंबिवली एमआयडीसीतील एका कंपनीत आग लागली होती. त्यात १७ जणांचा मृत्यू झाला होता. त्या ठिकाणापासून साधारण ३०० मीटरवर आज पुन्हा आग लागली आहे. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून आसपासचा परिसर रिकामा करण्यात आला आहे. आजूबाजूच्या कारखान्यांतील कामगारांना बाहेर काढलं जात आहे. एमआयडीसीच्या जवळ असलेल्या अभिनव विद्यालय शाळेतील विद्यार्थ्यांना सुट्टी देण्यात आली आहे. आगीच्या घटनेनंतर एमआयडीसी परिसरातील वीजपुरवठा बंद करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!