मुंबई : वृत्तसंस्था
परदेश दौऱ्यावर असलेले काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या आरक्षणविरोधी वक्तव्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने राज्यव्यापी ‘काँग्रेस हटवा, आरक्षण वाचवा’ आंदोलन करण्यात आले. राहुल गांधी यांनी त्यांच्या अमेरिका दौऱ्यात “भारतात निष्पक्षता आल्यावर आरक्षण संपुष्टात येईल” असे वक्तव्य केले होते. त्यानंतर हा वाद निर्माण झाला. त्यांच्या या वक्तव्याचा विरोध करण्यासाठी भाजपने आक्रमक पवित्रा घेतला असून आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.
राहुल गांधी यांच्या या वक्तव्यावर विविध राजकीय पक्षांनी टीका केली होती. यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्त्वात अकोल्यात, तर पक्षाचे अध्यक्ष आशिष शेलार आणि पक्षाच्या आमदार पंकजा मुंडे यांनी मुंबईत आंदोलनाचे नेतृत्व केले. या व्यतिरीक्त ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी जळगावात, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी पुण्यात आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार चंद्रपुरात आंदोलनाचे नेतृत्व केले. याशिवाय छत्रपती संभाजीनगरमध्ये गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, अहमदनगरमध्ये पक्षाचे आमदार राम शिंदे, नाशिकमध्ये आमदार देवयानी फरांदे आणि सीमा हीरे, नागपुरात पक्षनेते विक्रांत पाटील आणि नंदुरबारमध्ये आदिवासी विकास मंत्री आणि पक्षाचे पदाधिकारी विजय चौधरी यांनी आंदोलनाचे नेतृत्व केले.
राहुल गांधी यांच्या मनातले, त्यांच्या पोटातले ओठात आले, असल्याची टीका भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी केली आहे. आपल्या देशाची गरीमा आहे. ती प्रत्येक जातीच्या, प्रत्येक धर्माच्या व्यक्तीने ठेवली पाहिजे. मात्र, ती गरिमा घालवण्याचे काम राहुल गांधी यांनी केले आहे. भारतीय संविधानाचा अपमान त्यांनी करायला नको होता. या बाबतीत त्यांनी खुलासा करायला हवा. इतकेच नाही तर त्यांचे मित्र पक्षांनी देखील राहुल गांधींच्या मतांशी ते सहमत आहेत का? हे स्पष्ट करायला हवे. त्यांनीही या बाबतचा खुलासा करावा, असे आव्हान पंकजा मुंडे यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना दिले आहे.