पुणे : वृत्तसंस्था
‘शाहू, फुले, आंबेडकर यांच्या महाराष्ट्रात आतापर्यंत कधीही झुंडशाही खपवून घेतली गेली नाही. आज मात्र विचारवंतांवर होणारे हल्ले पाहता निर्माण होणारी झुंडशाही ही लोकांना पटणारी नाही. तसेच ज्यांनी पक्ष स्थापन केला, पक्षाची उभारणी केली, त्यांच्या हातातून पक्ष काढून घेऊन दुसऱ्यांना दिला, असे देशात यापूर्वी घडलेले नाही,’ अशा शब्दांत खासदार शरद पवार यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयाबाबत रविवारी पुण्यात प्रतिक्रिया दिली. तसेच मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही, मी यापूर्वी जाहीर केले आहे. त्यामुळे भावनिक आवाहन करू नका, अशी विनंतीही पवार यांनी केली आहे.
पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ला प्रकरणात त्यांचे संरक्षण करणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांचा सन्मान रविवारी पुण्यातील निसर्ग मंगल कार्यालयात करण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या डॉक्टर सेलच्या वतीने मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यानंतर पवार यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते पुढे म्हणाले, मी बारामती लोकसभा निवडणूक लढणार आहे, अशी अफवा पसरवली जात आहे. मी काही निवडणुकीला उभा राहणार नाही.
बारामतीचे लोक शहाणे आणि जाणकार आहेत. वर्षानुवर्षे कोणी काम केले हे त्यांना माहीत असल्याने ते निर्णय घेतील. माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे की, बैलजोडीवर मी पहिली निवडणूक लढवली आहे. आमच्या पक्षाचे चिन्ह यापूर्वी दोन वेळा गोठवण्यात आले. चिन्ह हे कायमच मर्यादित काळासाठी उपयुक्त ठरत असते. आता निवडणूक आयोगाने दिलेला निर्णय हा आश्चर्यकारक आहे. कारण ज्यांनी पक्ष स्थापन केला, त्यांच्या हातातून पक्ष काढून तो दुसऱ्याला देण्यात आला आहे. तर पत्रकार निखिल वागळे यांच्यावरील हल्ला याचा अर्थ स्पष्ट आहे की, आजचे राज्यकर्ते हे झुंडशाहीच्या मागनि जात आहेत. राज्याचा नागरिक योग्य तो निर्णय याबाबत घेणार आहे.