रायगड: महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा एकदा डोकेवर काढले आहे. राज्यातील रुग्ण संख्या वाढू लागल्याने मार्चपासून लॉकडाउन लावण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल सांगितले होते. दरम्यान आज राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकदा राज्यातील जनतेला कोरोनाचे नियम पाळण्याचे आवाहन केले आहे. राज्यातील जनतेने कठोर निर्णय घेण्याची वेळ येऊ देऊ नये असा निर्वाणीच इशारा अजित पवारांनी दिला आहे. न्हावा शेवा टप्पा-३ योजनेचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते.
‘राज्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढायला लागला आहे. दररोज रुग्णांची वाढते आहे. सावध राहायला हवे. मास्क वापरायला हवा. शहरात लॉकडाउनची वेळ येणार नाही, याची काळजी घेण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यवतमाळ, अमरावती, अकोला या जिल्ह्यांमध्ये काही कठोर निर्णय घ्यावे लागले. पुण्यातही थोडी कडक भूमिका घ्यावी लागली. प्रशासन व राजकीय प्रतिनिधींशी चर्चा करून रात्रीच्या वेळी कडक भूमिका घेण्यात आली आहे,’ असे अजित पवार म्हणाले.
मंत्रिमंडळातील सहकारी कोरोना बाधित झाल्याने आणि संख्या वाढत असल्याने चिंता वाढली आहे. एकदा लॉकडाउन केल्यानंतर संपूर्ण अर्थव्यवस्थेची घडी विस्कटून जाते. दिवसभर काम केल्यानंतर ज्यांची संध्याकाळी चूल पेटते, त्यांची तर एवढी बिकट अवस्था होते. लोकांचं करोनाबद्दलचं गांभीर्य निघून गेले आहे. कठोर निर्णय घेण्याची वेळ राज्य सरकारवर येऊ देऊ नका, हेच मला महाराष्ट्रातील जनतेला सांगायचं आहे,” असा निर्वाणीचा इशारा अजित पवार यांनी दिला आहे.