मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा दारूण पराभव झाला. त्यानंतर राज्यात गेल्या तीन दिवसात महाविकास आघाडीतील नाराजी नाट्य समोर आले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचा संजय राऊत यांनी नारा दिला. त्यानंतर आता चंद्रकांत खैरे यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडू नका अशी भावनिक हात देत शिवसैनिकांना हात जोडले. इतक्यावरच ते थांबले नाही, त्यांनी ठाकरे गटाचे कार्यकर्ते, पदाधिकाऱ्यांना दंडवत घातला. पक्षाला सोडून न जाण्याचे आवाहन करत खैरे नतमस्तक झाले. या मेळाव्याची राज्यभर चर्चा होत आहे.
शनिवारी छत्रपती संभाजीनगर येथील संत एकनाथ रंगमंदिर येथे ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकार्यांचा मेळावा झाला. त्याला विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे उपस्थित होते. या मेळाव्याला कार्यकर्त्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याचे खैरे म्हणाले. जिल्हा परिषद, पंचायत समिती, महापालिका आणि नगरपरिषदांची निवडणूक आहे. काही लोकांना वाटते की, आता पुढे काय..? मिधें गटाचे लोक त्यांना फसवत आहेत. तुमच्याकडे काय उरलंय असे ते म्हणतायेत. म्हणून मी मेळाव्यात एकनिष्ठ शिवसैनिकांना दंडवत घातला. त्यांना सोबत राहण्याचे आवाहन केले. उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करण्याचे आवाहन केले.
मला काही कळत नाही सरपंचानाच, काय उडवत आहेत. सरपंचांना का मारत आहेत? असा प्रश्न खैरेंनी विचारला. मी बीडचा संपर्कप्रमुख असताना गुंडगिरीचा बिमोड व्हावा म्हणून प्रयत्न केले. मला धनंजय मुंडे यांचे वाईट वाटते, धनंजय मुंडे यांचे काय काय सुरू आहे, करुणा मुंडे काय काय बोलतात, फेसबुक मध्ये काय चाललंय, हे त्यांनी समजून घेतलं पाहिजे आणि त्यांनी राजीनामा देऊन मोकळे झाले पाहिजे, तुम्ही स्वच्छ झाले की परत या, असे खैरे यांनी आवाहन केले.