कोल्हापूर : वृत्तसंस्था
आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली असून अनेक नेते राज्याच्या दौऱ्यावर बाहेर पडले असून आता मनोज जरांगे पाटील यांनी देखील इशारा दिला आहे.
जरांगे पाटील म्हणाले कि, मराठ्यांना हिणवणारे अनेक जण आहेत. मात्र अशा अनेक जणांना मराठ्यांची जात हिसका दाखवल्याशिवाय राहणार नाही असा इशारा त्यांनी दिला आहे. तसेच काही जणांनी लोकांची माझ्याबद्दलची भावना जाणून घेतली तर त्यांचे डोळे पांढरे होतील असा पलटवार त्यांनी टीका करणाऱ्यांवर केला आहे. जरांगे यांची शांतता रॅली कोल्हापूरमध्ये झाली. त्यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला.
बीडमध्ये मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा ताफा अडवून त्यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकण्यात आल्या होत्या. याप्रकरणी मनोज जरांगे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे म्हणाले, राज ठाकरे यांना कोणीही आडवू नका. कारण, सध्या राज्यात मराठा समाजाचे आंदोलन सुरू नाही. जाब विचारायचा असेल तर आपण मुंबईला जाऊन जाब विचारू. भाजपमधील लोक माझ्या विरोधात टोळ्या उभ्या करत आहेत. जे मराठा आरक्षणाच्या विरोधात बोलतात त्यांना मी सोडत नाही”, असे मनोज जरांगे यांनी म्हंटले आहे.
मनोज जरांगे यांनी यावेळी सत्ताधाऱ्यांवर टीका केली आहे. ”काहींनी बोलताना विचार केला पाहिजे की परिस्थिती काय आहे आपण बोलतोय काय, त्यात आपल्याला काय आनंद आहे. काहींना सत्यता नाकारणे, कोणाला खुश करण्यासाठी कोणाला दुखवायचे, कोणाला हिणवायचे यातच आनंद मिळतो. मात्र मराठ्यांना हिणवणारे या राज्यात टिकत नाहीत. कारण मराठा समाजात निष्ठा आहे. मराठा समाजाला काही जण कमजोर समजतात. मात्र मराठ्यांची जात कमजोर नाही. मराठा हिणवणाऱ्यांना हिसका दाखवतोच”, असा इशारा मनोज जरांगे यांनी दिला आहे.
तसेच टीका करणाऱ्यांवर मनोज जरांगे यांनी निशाणा साधला आहे. ते म्हणाले, ”प्रत्येक क्षेत्रात असतात काही जण असे असतात जे सतत नकारात्मक बोलत असतात. फक्त कोणाचे कुठे चुकतंय हेच ते बघतात, चांगली बाजू अशा लोकांना माहित नसते किंवा त्यांना ती जाणून पण घ्यायची नसते. त्यांनी माझ्याबद्दल लोकांमध्ये असणारी भावना जाणून घेतली तर त्या काही लोकांचे डोळे पांढरे होतील. इतकी निष्ठा माझ्या मराठा समाजाची माझ्यावर आहे. हाच आपल्याला आरक्षण देऊ शकले असा त्यांना विश्वास आहे”, असे जरांगे म्हणाले.