सोलापूर : वृत्तसंस्था
गेल्या काही दिवसापासून राज्यातील सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये आरोप प्रत्यारोप सुरु असताना आता सोलापूर जिल्ह्यात देखील महायुतीत बिघाडी झाल्याचे चित्र दिसू लागले आहे. जिल्ह्यातील नगर पंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणुकीचा धुमाकूळ सुरू आहे. या दरम्यान महायुतीमध्ये तणाव असल्याचे चित्रदेखील पाहायला मिळत आहे. यातच आता शहाजी बापू पाटील यांनी सांगोला नगरपालिकेच्या निवडणुकीवरून भाजपवर हल्लाबोल केला आहे. शहाजी बापू पाटील म्हणाले की, निवडणूक खरी स्वाभिमानाची आहे, पण आपल्याला गुलाम बनविले. त्यापेक्षाही जास्त मोठी गुलामगिरी आपल्यावर आल्याचे बापू सांगोल्यात बोलतांना म्हणालेत.
दीपक साळुंखे आणि जयकुमार गोरे यांच्यावर टीका करताना शहाजी बापू म्हणाले की- स्वाभिमानाची निवडणूक आहे. आपल्याला गुलाम बनविले, त्यापेक्षा जास्त मोठी गुलामगिरी आली आहे. गणपतराव देशमुख 75 वर्षे आणि मी 51 वर्षे इथे आहे, स्वाभिमानी जनता होती. आता हेलिकॉप्टर घेऊन येत धाड धाड गुंडशाही सुरू केली. निवडणुकीपूर्वी मला माहीत होते भाजपने कंबरडे मोडले. मला पाडण्यासाठी भाजपने शेकापला मदत केली. भाजपसोबत इतका प्रामाणिक वागून माझ्यासोबत का असे वागले? असा प्रश्नही शहाजी बापूंनी उपस्थित केला.
पुढे बोलताना शहाजी बापू पाटील म्हणाले, ही लढणारी औलाद आहे. पैशावर तालुका विकत घेण्याचा नाद करू नका. महाराष्ट्र मला घाबरतो, अन् आता ही कुत्री मांजरं मला घाबरवायला लागले आहेत. या तालुक्यात दोनच राजे आहेत. एक म्हणजे गणपतराव देशमुख आणि दुसरा तो म्हणजे शहाजी बापू. आता गणपतराव देशमुख यांच्या समाधीला पूजनाचा अधिकारी यांचा नाही.
शहाजी बापू पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला. ते म्हणाले की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा कोणताही शब्द मी मोडला नाही. लोकसभेला मी आजारी असतानाही भाजप उमेदवाराला पंधरा हजाराचं मताधिक्य दिलं. मी माझ्या आजारपणाचा कोणताही विचार न करता काम करत राहिलो, याचं फळ मला दिलयं का? असा प्रश्नही शहाजी बापू पाटील यांनी उपस्थित केला आहे.