ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ. हेरंबराज पाठक यांच्या सेवेचा आदर्श इतरांनी घ्यावा : गायकवाड ; प्रशासकीय सेवेतून निवृत्त

 

अक्कलकोट,दि.२ : आजच्या काळात आपल्यावर सेवेवर कोणताच डंक न लागता शासकीय सेवेतून बाहेर पडणे पराकाष्टाचे  आहे . शासकीय सेवेतील एक अष्टपैलू व्यक्तिमत्व आज लुप्त होत असून पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यांनी डॉ . हेरंबराज पाठक यांच्या कार्याचा आदर्श नजरेसमोर ठेवून पुढील वाटचाल करावे, असे प्रतिपादन
सभापती सुनंदा गायकवाड यांनी केले .
पंचायत समिती अक्कलकोट येथे प्रशासन अधिकारी म्हणून कार्यरत असलेले डॉ . हेरंबराज पाठक हे ३० एप्रिल रोजी सेवानिवृत्त झाले . त्यांच्या कार्याची पोचपावती म्हणून पंचायत समिती कर्मचारी यांच्या वतीने छोटेखानी निरोप समारंभाचा कार्यक्रम सोशल डिस्टन्स पाळून करण्यात आला . यावेळी सभापती गायकवाड बोलत होत्या . याप्रसंगी गटविकास अधिकारी महादेव कोळी, प्रकल्प अधिकारी बालाजी अल्लडवाड , पंचायत समिती सदस्य राजेंद्र बंदीछोडे, तालुका वैद्यकीय अधिकारी अश्विन करजखेडे, गटशिक्षण अधिकारी अशोक भांजे, समर्थ नगरी परिवाराचे प्रमुख सल्लागार डॉ . मनोहर मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती .

डॉ . हेरंबराज पाठक यांची सोलापूर जिल्हा परिषदेत ३७ वर्षे सेवा झाली असून त्यांच्या कामाची दखल घेत नऊ वेतनवाढ मिळालेले आहेत. त्यांनी संगीत क्षेत्रात पीएचडी केली असून अध्यात्मिक क्षेत्रातील गाढे अभ्यासक म्हणून त्यांची ओळख आहे. संगीतातील उत्कृष्ट कार्याची दखल घेत मध्यप्रदेश सरकारने त्यांचा सन्मान केला. त्याचबरोबर महाराष्ट्र शासनाच्या वतीने देखील त्यांचा सन्मान करण्यात आला. सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने देखील त्यांचा सन्मान करून दोन वाढीव वेतन देण्यात आले. शासकीय क्षेत्र व संगीत क्षेत्रासह साहित्य क्षेत्रामध्ये देखील त्यांचे उत्कृष्ट कार्य असून पाच वृत्तपत्रात त्यांचा लेख प्रकाशित होत असतो. त्यांची नऊ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद – पंचायत समिती , नगर परिषद निवडणुकीच्या वेळी तज्ञ प्रशिक्षक म्हणून अनेक वेळा त्यांनी काम पाहिले आहे. असे व्यक्तिमत्व पंचायत समितीच्या सेवेतून निवृत्त होत असल्याने सर्व कर्मचाऱ्यांच्या वतीने त्यांना निरोप देण्यात आला .डॉ . हेरंबराज पाठक यांच्या शासकीय ,सामाजिक, अध्यात्मीक , साहित्यिक आदी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य पाहता अक्कलकोट तालुक्यातील वेगवेगळ्या संस्थेच्या वतीने कोरोनाची महामारी संपल्यानंतर गुणगौरवाचे कार्यक्रम ठेवण्यात येणार आहे . त्यामध्ये त्यांच्या तीन पुस्तकाचे प्रकाशन देखील ठेवण्यात येणार आहे,अशी माहिती  डॉ. मनोहर मोरे यांनी दिली .या छोटेखानी निरोप समारंभास पंचायत समिती अधिकारी ,कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!