डॉ. जनार्दन वाघमारे, प्रा. मिलिंद जोशी. अॅड. बी.एस. पाटील यांना ‘मसाप’ अक्कलकोटचे राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर
अक्कलकोट – येथील महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, शाखा अक्कलकोटच्या वतीने यंदाच्या वर्षी ज्येष्ठ साहित्यिक आणि माजी कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे, महाराष्ट्रातील चतुरस्त्र वक्ते प्रा. मिलिंद जोशी, आणि ज्येष्ठ शिक्षणतज्ञ व ज्येष्ठ विधीज्ञ ॲड. बी. एस. पाटील यांना यंदाच्या वर्षी राज्यस्तरीय पुरस्कार जाहीर करण्यात आल्याची माहिती मसाप अक्कलकोट शाखेच्या अध्यक्षा सौ. शैलशिल्पा जाधव यांनी दिली.
गुरुवार दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ११ वाजता अक्कलकोट येथील श्री. स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे स्व. बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये भारताचे माजी केंद्रीय गृहमंत्री. सुशीलकुमार शिंदे यांच्या हस्ते आणि महाराष्ट्राचे माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या अध्यक्षतेखाली आणि श्री. स्वामी समर्थ देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष महेश इंगळे, श्री. स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे कार्यकारी विश्वस्त अमोलराजे भोसले, महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे, सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी पद्माकर कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष अशपाक बळोरगी, कृषी उत्पन्न बाजार समिती दुधनीचे सभापती प्रथमेश म्हेत्रे, कृषी आणि पशुसंवर्धन जिल्हा परिषद सोलापूरचे माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, युवा नेत्या शितल म्हेत्रे, आणि स्व. बाळासाहेब इंगळे पॉलिटेक्निक कॉलेजचे प्राचार्य नागनाथ जेऊरे यांच्या प्रमुख उपस्थितीत या राज्यस्तरीय पुरस्काराचे वितरण होणार आहे.
लातूरचे ज्येष्ठ साहित्यिक, माजी खासदार, तथा स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे संस्थापक कुलगुरू डॉ. जनार्दन वाघमारे यांना त्यांनी साहित्य क्षेत्रात आत्तापर्यंत केलेल्या कार्याबद्दल श्रीमंत विजयसिंहराजे भोसले यांच्या स्मरणार्थ, तर महाराष्ट्र साहित्य परिषदेचे पुण्याचे कार्याध्यक्ष आणि चिंतनशील चतुरस्त्र वक्ते प्रा. मिलिंद जोशी यांना साहित्यिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रात केलेल्या विशेष योगदाना बद्दल स्व. बाळासाहेब इंगळे यांच्या स्मरणार्थ, आणि पश्चिम महाराष्ट्रातील शैक्षणिक, सामाजिक, राजकारण आणि साहित्य क्षेत्रात दीर्घकाळ कार्यरत असणारे इस्लामपूरचे ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. बी. एस. पाटील (अण्णा) यांना स्व. मातोश्री लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या स्मरणार्थ राज्यस्तरीय पुरस्कार सन्मानपूर्वक दिले जाणार आहेत. रोख रक्कम, सन्मानपत्र, शाल, श्रीफळ आणि पुस्तक असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या समारंभाला साहित्य व सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर रसिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन महाराष्ट्र साहित्य परिषद पुणे शाखा अक्कलकोटच्या अध्यक्षा.सौ. शैलशिल्पा जाधव आणि प्रमुख कार्यवाह दिनकर शिंपी यांनी केले आहे. या प्रसंगी सौ. आरती काळे, अभय खोबरे, दत्तात्रय बाबर, लक्ष्मण पाटील, सौ.पुष्पा हरवाळकर, मुकुंद पत्की, बापुजी निंबाळकर, प्रा. भिमराव साठे, राजु भोसले, सुभाष सुरवसे, प्रभाकर गुरव, राजेश पडवळकर, दयानंद परिचारक आदी उपस्थित होते.