सोलापूर : प्रतिनिधी
न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने हिचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे. पोलिसांनी मनीषा विरोधातील कागदपत्रे जमा करण्यासाठी सरकारी वकिलांकडे मुदत मागितली. त्यानुसार सरकारी वकिलांनी न्यायालयाकडून 14 तारखेपर्यंत मुदत वाढवून घेतली आहे. त्याच बरोबर पोलिसांनी मनीषाला अधिक तपासासाठी तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी केली आहे.
मनीषाला अटक केल्यानंतर पाच दिवसांची पोलीस कोठडी मिळाली. त्यानंतर ती न्यायालयीन कोठडीत आहे. तिच्या वकिलांनी जामिनासाठी अर्ज केला होता. त्या अर्जावर शुक्रवारी (दि. 9) सरकार पक्षाला म्हणणे मांडण्यास सांगितले होते. पंरतु तपास अधिकार्यांनी कागदपत्रे जमा करण्यासाठी मुदत मागितली. त्यानुसार सरकारी वकील अॅड. प्रदिपसिंह रजपूत यांनी न्यायालयाकडे दि. 17 मे पर्यंत कागदपत्रे सादर करण्याची मुदत मागितली. मनीषाच्या वकिलांनी त्यास हरकत घेतली दि. 14 मे तारीख देण्याची विनंती केली. ही विनंती न्यायालयाने मान्य केली. त्यानुसार दि. 14 मे रोजी पोलिसांनी कागदपत्रे सादर केल्यावर मनीषाच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे. पोलिसांच्या या खेळीमुळे मनीषाचा न्यायालयीन कोठडीतील मुक्काम वाढला आहे.
मनीषाकडे अधिक तपास करायचा आहे. त्यामुळे वाढीव तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्याची मागणी पोलिसांनी मुख्य न्यायाधीश विक्रमसिंह भंडारी यांच्याकडे केली. आरोपीस हजर न करता पोलीस कोठडी देता येणार नाही. त्यानंतर तपास अधिकार्यांनी सरकारी वकिलांमार्फत आरोपीचे प्रोडक्शन वॉरंट मिळण्याचा अर्ज सादर केला. तो न्यायालयाने मंजूर केला. त्यामुळे आता मनीषाला पोलीस कोठडी मिळण्यासाठी पोलीस तिला न्यायालयात कधीही हजर करू शकतात.