सोलापुर : वृतसंस्था
गेल्या काही दिवसापासून डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्या प्रकरण जोरदार चर्चेत आले आहे. आता या प्रकरणात संशयित आरोपी मनीषा मुसळे – माने हिला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. पाच दिवसांची पोलीस कोठडी पूर्ण झाल्यानंतर आरोपी मनीषा मानेला न्यायालयीन कोठडी देण्याची विनंती तपासाधिकाऱ्यांनी केली होती. पुन्हा पोलीस कोठडी मागण्याचे हक्क अबाधित ठेवत न्यायालयीन कोठडी देण्याची तपासअधिकाऱ्यांची न्यायालयात मागणी केली होती.
सरकारी पक्षाची बाजू ऐकत मुख्य न्यायादंडाधिकारी विक्रमसिंह भंडारी यांनी मनीषा मानेला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. डॉ. शिरीष वळसंगकर आत्महत्येप्रकरणी नवनवीन माहिती समोर येत असून, हॉस्पिटलमधील अनेक कर्मचाऱ्यांनी आरोपी मनीषा माने-मुसळे यांच्या विरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. या तक्रारींच्या अनुषंगाने सोलापूर शहर पोलिस तपास सुरू आहेत.
याशिवाय फिर्यादी डॉ. अश्विन वळसंगकर, सोनाली वळसंगकर आणि इतर संबंधित व्यक्तींचेही जबाब पोलिसांकडून नोंदवले जात आहेत. संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरु असून, लवकरच डॉ. वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या खऱ्या कारणांचा उलगडा होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.