ध्यास विश्वसार्ह बातमीचा

डॉ. वळसंगकर प्रकरणाला नव वळण : डॉ. शोनाली वडिलांसह गायब

सोलापूर : वृत्तसंस्था

 

सोलापुरातील प्रसिद्ध न्युरो फिजिशिअन डॉ. शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या 15 दिवसांनंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत. सून डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याची चर्चा हॉस्पिटलमध्ये रंगली आहे. ते दोघे नेमकं कुठे गेले याची कोणालाच माहिती नाही.

तशातच डॉ. शिरीष यांच्या पत्नी डॉ. उमा यांनी हॉस्पिटलची सर्व सूत्रे हाती घेतली आहेत. त्या हॉस्पिटलच्या घरी राहायला देखील आल्याचे विश्वसनीय सूूत्रांनी सांगितले. डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येनंतर एकापाठोपाठ एक धक्कादायक घडामोडी घडताना दिसत आहेत. त्यांच्या आत्महत्येप्रकरणी हॉस्पिटलची संशयित कर्मचारी मनीषा मुसळे-माने हिला झालेली अटक, मुलगा डॉ. आश्विन आणि सून डॉ. शोनाली यांची चौकशी, डॉ. शिरीष यांनी लिहिलेल्या चिठ्ठीवरील सही खरी की खोटी हा वाद.

डॉ. आश्विन यांचे हॉस्पिटलचे घर सोडून मोदी येथील घरात स्थलांतर करणे यासह वळसंगकर कुटुंबातील अंतर्गत कलहाचीही चर्चा रंगली आहे. तशातच आता धक्कादायक बातमी समोर येत आहे. डॉ. शोनाली आणि त्यांचे वडील डॉ. दिलीप जोशी यांनी दोन दिवसांपासून सोलापूर सोडल्याची चर्चा आहे. दोघे भारत सोडून गेल्याचीही कुजबुज कर्मचार्‍यांमध्ये सुरू आहे. डॉ. दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेत आहे. त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याचेही काहीजण सांगत आहेत. डॉ. शोनाली या आता मुंबई येथे स्थायिक होणार आहेत. त्यामुळेच ते गेले असल्याचेही काही कर्मचार्‍यांचे म्हणणे आहे. तर दुसरीकडे डॉ. शोनाली या 30 मे नंतर ओपीडी पहाणार आहेत असेही काही कर्मचार्‍यांकडून सांगण्यात येत आहे. या सर्व चर्चा असल्यातही ते दोघे नेमके गेले कुठे याची कोणालाच कल्पना नाही.

डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येप्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे-माने ही सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. मनीषा हिच्या सोबत अजून कोण सामील आहे याचा तपास करावयाचा असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे; परंतु मनीषा हिच्या पलीकडे तपास गेला नसल्याचे दिसत आहे. डॉ. शिरीष यांच्या आत्महत्येसाठी कौटुंबिक कलह देखील असल्याची चर्चा होती. त्यातच मनीषा हिच्यानंतर ज्यांच्यावर सर्वात जास्त संशयाचे धुके होते त्या डॉ. शोनालीच आता गायब झाल्याची चर्चा आहे. डॉ. शोनाली यांच्याकडे पोलिसांनी कोणती चौकशी केली, त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे का, त्या सोलापूर सोडून जाऊ शकतात का, असे अनेक प्रश्न समोर येत आहेत.

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!