नवी दिल्ली : वृत्तसंस्था
भारतीय संघाचे माजी मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी आपल्या धाडसी निर्णयाने क्रिकेट चाहत्यांची मने जिंकली आहेत. टी २० विश्वचषक जिंकल्यानंतर बीसीसीआयकडून मिळणारा बोनस त्यांनी कमी केला. वास्तविक, द्रविड यांना ५ कोटी रुपयांचा बोनस मिळाला होता, पण त्यांनी यातील निम्मे म्हणजे केवळ अडीच कोटी रुपये घेतले आहेत.
बीसीसीआयने संघाला १२५ कोटी – रुपयांची बक्षीस रक्कम दिली होती. ही रक्कम खेळाडू, कोचिंग स्टाफ आणि सपोर्ट स्टाफमध्ये विभागून देण्यात आली. त्यानुसार ५१ वर्षांचे प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्या खात्यात ५ कोटी तर, इतर प्रशिक्षकांच्या खात्यात अडीच कोटी रुपये जमा होणार होते. द्रविड यांनी बीसीसीआयला त्यांची बक्षीस रक्कम ५ कोटींवरून २.५ कोटी रुपये करण्याची विनंती केली. त्यांना फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षकांपेक्षा जास्त पैसे घ्यायचे नव्हते.
द्रविड यांनी बीसीसीआयला त्यांची बक्षीसाची रक्कम कमी करण्याची विनंती केली. सर्व प्रशिक्षकांना समान रक्कम मिळाली पाहिजे, असे राहुल द्रविड यांचे मत आहे. राहुल द्रविड यांना त्यांच्या उर्वरित स्टाफएवढाच बोनस घ्यायचा होता. यामुळे आम्ही त्यांच्या मताचा आदर करतो,’ असे बीसीसीआयकडून सांगण्यात आले.