ध्यास विश्वसार्ह बातमीचा

पाक नौकेतून ६०० कोटींचे अमली पदार्थ जप्त

अहमदाबाद : वृत्तसंस्था

भारतीय तटरक्षक दलाने गुजरातच्या किनारपट्टी भागात अमली पदार्थ तस्करांविरोधात रविवारी मोठी कारवाई करत पाकिस्तानी नौका जप्त केली. या नौकेवरून ६०० कोटी रुपये किमतीच्या अमली पदार्थासह १४ जणांना अटक करण्यात आली आहे.

भारतीय तटरक्षक दलाने गुजरात दहशतवादविरोधी पथक (एटीएस) आणि अमली पदार्थ नियंत्रण ब्युरो (एनसीबी) सोबत अरबी समुद्रात संयुक्त अभियान राबवले. गोपनीय माहितीच्या आधारावर तटरक्षक दलाने ‘राजरतन’ जहाजाच्या मदतीने पाकची नौका ताब्यात घेतली. या नौकेवरून ६०० कोटी रुपये किमतीचे जवळपास ८६ किलो अमली पदार्थ जप्त करण्यात आले. या वेळी नौकेवरील १४ जणांनादेखील अटक करण्यात आल्याची माहिती तटरक्षक दलाने दिली; पण नौकेवरून कुठल्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले, याचा खुलासा तटरक्षक दलाने केला नाही. संयुक्त अभियान यशस्वी व्हावे, यासाठी विमानांची देखील तैनाती करण्यात आली होती. तत्पूर्वी, रविवारी सकाळच्या सुमारास एका वेगळ्या कारवाईत एनसीबीने एटीएससोबत मिळून ३०० कोटींचे अमली पदार्थ बनवणाऱ्या टोळीचा भंडाफोड केला होता. गुजरात आणि राजस्थानमध्ये मार्चच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण ९३२.४१ कोटी रुपये किमतीचे अमली पदार्थ, मद्य, किमती धातू आणि अवैध रोकडसह इतर ऐवज जप्त करण्यात आला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!