दुधनी नगरपरिषदेकडून थकीत कर वसुलीसाठी धडक मोहीम,बड्या थकबाकीदारांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करणार : मुख्याधिकारी
अक्कलकोट, दि.२५ : मार्च एन्डच्या पार्श्वभूमीवर दुधनी नगर परिषदेच्यावतीने कर वसुली मोहीम तीव्र करण्यात आली असून करवसुलीसाठी दोन गाळे सील करण्यात आलेले आहेत. प्रशासनाने शहरातील थकबाकीदारांना जप्ती पूर्व व जप्तीच्या नोटिसा यापूर्वीच बजावल्या आहेत. आजपर्यंत शहरातील २७ थकीत मालमत्ता कर धारकांचे नळकनेक्शन खंडित करण्यात आले असून त्यावर पुढील कार्यवाही करण्यात येत आहे. जप्तीची कार्यवाही सुरुवात करताच १ लाख ५० हजारापर्यंतचे मालमत्ता कर पाणीपट्टी व गाळा भाडे जमा झाले असून मागील पंधरा दिवसात १५ लाख रुपये पर्यंत कर वसूल झाल्याची माहिती मुख्याधिकारी अतिष वाळुंज यांनी दिली.जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, सहआयुक्त अनिकेत मनोरकर यांच्या आदेशानुसार ३१ मार्च वर्षाअखेर वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी वसुली मोहीम अंतर्गत कडक कारवाई करण्याचा इशारा मुख्याधिकार्यांनी दिला आहे. यात बड्या थकबाकीदारांची नावे सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.कर निरीक्षक आर. आर.गुंड, कार्यालय अधीक्षक सी.एस कोळी, लिपिक आर. एस अत्ते,सी बी पाटील शांतलिंग चिंचोळी, एम. एस म्हेत्रे, गुरुशांत मगी, मौला गायकवाड व स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या वसुली पथकाकडून जप्तीची व सिलिंगची कार्यवाही करण्यात येत आहे.