गुरुशांत माशाळ,
दुधनी दि ०४ :जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी जिल्ह्यातील कोणत्याही शहरात आठवडी बाजार न घेण्याचे आदेश दिले होते. यातून कोरोनाचा संसर्ग होण्याची भीती देखील व्यक्त केली होती. परंतु या आदेशाची पायमल्ली करणारे चित्र दुधनी शहरात मंगळवारी सकाळी पहायला मिळाले.
संसर्गजन्य कोरोनाने संपुर्ण देशात हाहाकार माजवला आहे. कोरोनाच्या या हाहाकाराला रोखण्यासाठी राज्य सरकारने कडक निर्बंध लादूनही आज बाजारपेठेत नागरिकानीं गर्दी केली होती. अनेकांच्या तोंडावर मास्क नव्हते त्या बरोबर कोणी साधा रुमाल देखील बांधला नव्हता. अशा प्रकारे गर्दी जमवल्यामुळे कोरोना संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होत आहे. प्रशासनाने कडक निर्बंधाची अंमलबजावणी करण्यासाठी नागरिकांनी स्वतःच्या व कुटुंबियांच्या जीवितास घरात बसणे गरजेचे आहे. नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे कोरोनाला आमंत्रण मिळत आहे.
अक्कलकोट तालुक्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रशासन कोरोना रुग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी अथक प्रयत्न करीत आहे. मात्र नागरिक सरकारी आदेश झुगारून गर्दी करून स्वतः जीव धोक्यात घालून फिरत आहेत. दुधनी शहरात मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून किराणा, भाजीपाला, फळे घेण्यासाठी नागरिकांनी येथील बाजारपेठेत नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. येथील नागरिकांना कोरोनाचा विसर पडल्याने सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला होता.मागील पंधराहुन अधिक दिवसांपासून बाजारपेठेतील अत्यावश्यक सेवेतील दुकाने वगळता बाकी सर्व दुकाने बंद आहेत. अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी ७ ते ११ यावेळेत चालू आहेत. यामुळे व्यापारी मोठ्या आर्थिक संकटांत सापडले आहेत.
पोलीस प्रशासन आणि नगरपालिका कर्मचाऱ्यांनी गर्दी करू नका, असे वेळोवेळी आवाहन करूनही नागरिक त्याकडे दुर्लक्ष करून तोबा गर्दी केली होती. याकडे प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी नागरिकांतून होत आहे. काही वेळेनंतर नगर परिषद कर्मचारी आणि अक्कलकोट दक्षिण पोलिसांनी या ठिकाणी जाऊन येथील नागरिकांना समजावून सांगून पुढील वेळी गर्दी न करण्याची तंबी दिली आणि काहीं मिनिटात गर्दी हटवली.