ध्यास विश्वसार्ह बातमीचा

मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के

छत्रपती संभाजी नगर : वृत्तसंस्था

राज्यातील मराठवाड्यातील अनेक ठिकाणी भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. नांदेड, परभणी , हिंगोलीमध्ये 4.5 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. सकाळी 6 वाजून 8 मिनिटांनी भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची माहिती मिळत आहे.

हिंगोली जिल्हयातील सर्वच गावांमधून गुरुवारी ता. 21 पहाटे 6 वाजून 8 मिनिटांनी भूकंपचा मोठा धक्का बसला आहे. 4.5 रिश्‍टर स्केलची नोंद झाली तर त्यानंतर काही वेळातच झालेल्या दुसऱ्या धक्कयाची 3.6 एवढी नोंद झाली असल्याचे आपत्ती व्यवस्थापन कक्षाच्या सुत्रांनी सांगितले. या भूकंपामुळे नुकसान झाल्यास त्याची माहिती तातडीने प्रशासनाला देण्याच्या सुचनाही गावपातळीवरील कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

हिंगोली जिल्हयात मागील तीन ते चार वर्षापासून जमीन हादरण्याचे प्रकार वाढले आहेत. जमीनीतून आवाज येऊन जमीन हादरत असून वारंवार होणाऱ्या या घटना आता गावकऱ्यांच्याही अंगवळणी पडल्या आहेत. विशेषतः औंढा नागनाथ तालुक्यातील पिंपळदरी, राजदरी, सोनवाडी, काकडदाभा, फुलदाभा या गावांसह वसमत तालुक्यातील वापटी, कुपटी, पांगरा शिंदे, वाई तर कळमनुरी तालुक्यातील सिंदगी, बोल्डा, पोतरा, नांदापूर या भागात जमीन हादरण्याचे प्रकार नित्याचेच झाले आहेत. दरम्यान, आज सकाळी सहा वाजून 8 मिनिटांनी जमीन चांगलीच हादरली. भूकंपाचा मोठा आवाजही झाला. विशेष म्हणजे आजचा भूकंप जिल्हयातील सर्वच 710 गावांमध्ये जाणवल्याचे सांगण्यात आले आहे. यामध्ये औंढा नागनाथ, वसमत, कळमनुरी तालुक्यात त्याची तिव्रता अधिक होती तर हिंगोली व सेनगाव तालुक्यातील काही गावांत कमी अधिक तिव्रता जाणवली आहे. या घटनेमुळे गावकरी चांगलेच हादरून गेले आहेत. दांडेगाव येथे काही घरांची पडझड झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!