मुंबई वृत्तसंस्था
महायुतीने विधानसभा निवडणुकीत विजय मिळवला.. आता नेमकं मुख्यमंत्री कोण होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. याबाबत आज काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली.
“मी काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या बोलणे केले. त्यावेळी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, तुम्ही जो काही निर्णय घ्याल, ज्याला मुख्यमंत्री पदाचा चेहरा बनवाल तो मला आणि शिवसनेनेला मान्य असेल.” असे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. “महायुतीला जे यश मिळाले, तो विजय अविश्वसनीय आहे. महायुतीने केलेल्या कामाची ही पोचपावती आहे. हा सर्व जनतेचा विजय आहे. या निवडणुकीमध्ये महायुतीच्या सर्वच नेत्यांनी काम केले आहे. मीही पायाला भिंगरी लावून एका सध्या कार्यकर्त्याना म्हणून काम करतो, मी मुख्यमंत्री स्वतः ला कधीच समजलो नाही. मी स्वतः ला एक सर्वसामान्य कार्यकर्त्याप्रमाणेच राहत होते. मी अडीच वर्षाच्या काळात मी जे काही काम केले, त्यामध्ये मी समाधानी आहे. महायुतीमध्ये भाजपनेही मला चांगले सहकार्य केले. त्यामुळे पंतप्रधान मोदी, अमीत शहा यांना धन्यवाद देईल. त्यांच्या सहकार्यामुळे राज्याचा विकासदेखील चांगला झाला. गेल्या अडीच वर्षात अनेकांचे प्रश्न सोडवले. मग ते शेतकरी असो, बेरोजगार असो, किंवा सर्वसामान्य असो.” अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.
“महाविकास आघाडीचे सरकार असताना ज्या योजनांना ब्रेक लागला. त्या कामांना आम्ही गती आणली. त्यामुळे मागे पडलेला आपला महाराष्ट्र हा एक नंबरवर पोहोचला. त्यानंतर झालेल्या निवडणुकीत राज्यात महाराष्ट्रने महायुतीला भरभरून प्रतिसाद दिला.” असे म्हणत त्यांनी महाराष्ट्रीतील जनतेचे आभार मानले. “महाराष्ट्राच्या राजकारणात अनेक सवाल उपस्थित करण्यात येत होते, की एकनाथ शिंदे नाराज आहेत वगैरे, पण असे काही नाही. आम्ही रडणारे नाही तर लढणारे आहोत. मी काल आधी अमित शहा त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी फोनवर बोलणे झाले. त्यावेळी त्यांना स्पष्टपणे सांगितले की, मुख्यमंत्रिपदाबाबत जो काही निर्णय घ्याल तो आम्हाला शिवसेना पक्षाला मान्य असेल,” असे स्पष्ट करत त्यांनी मुख्यमंत्रिपदावरील दावा सोडला.
दरम्यान, दुपारी 3 वाजताची पत्रकार परिषद ही 4 वाजता सुरू झाली. विशेष म्हणजे ठाण्याच्या निवासस्थानी त्यांनी ही पत्रकार परिषद घेतली. यावेळी शिवसेनेचे नेते संजय शिरसाट, दादा भुसे, रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, यांच्यासह अनेक आमदार उपस्थित होते.