मुंबई वृत्तसंस्था
राज्यात राजकीय घडामोडी घडत आहेत. मुख्यमंत्रीपदी देवेंद्र फडणवीस विराजमान होणार असून शिवसेनेचे आमदार उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेतली आहे. त्यात ते म्हणाले की, राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदेच असतील, ही आमची भूमिका आहे आणि ते मान्य करतील, हा आमचा विश्वास आहे, असे सामंत यावेळी म्हणाले आहेत.
मी काल स्वत: दोन वाजता देवेंद्र फडणवीसांना भेटलो, त्यानंतर गिरीश महाजनांना भेटलो. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांची चर्चा झाली, त्यात त्यांनी एकनाथ शिंदेंना त्यांच्या प्रकृतीची विचारणा केली. दोघांमध्ये जे बॉन्डिंग आहे ते पूर्वीपासून आहे. एकनाथ शिंदें यांच्या इच्छेपेक्षा आमच्या सगळ्या आमदारांची इच्छा आहे की, सरकारमध्ये आमचे नेतृत्व एकनाथ शिंदेंनीच करावे, ही आमची स्पष्ट भूमिका आहे. याच्यावर जर तर काहीच नाहीय. त्यामुळे एकनाथ शिंदे यांनी उमुख्यमंत्री व्हावे ही शिवसैनिकांची आणि त्यांच्यासोबत काम करणाऱ्या आमदार खासदारांची इच्छा आहे.
एक मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री हे निश्चित झालेले आहे. त्याच्यामुळे शिवसेना म्हणून आमची भूमिका, आमचे मत आमच्या नेत्याकडे मांडण्याचा आमच्याकडे अधिकार आहे. मी खात्रीलायक सांगतो की, आम्ही जो आग्रह केला आहे तो महाराष्ट्राच्या हितासाठी केलेला आग्रह आहे. आम्हाला सगळ्यांना स्वत:हून असे वाटते की, शिंदे हे राज्याच्या राजकारणात उपमुख्यमंत्री म्हणून असले पाहिजे, प्रशासनाबरोबर ते असले पाहिजे. त्यांनी निर्माण केलेल्या ज्या योजना आहेत. ज्याच्यामुळे सरकार येण्यामध्ये ताकद मिळाली आहे. अशा व्यक्तीने सरकारमध्ये राहिलचं पाहिजे, ही आम्हा सगळ्यांची भूमिका आहे.
पदांबाबत निर्णय होईल
मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री शपथ घेतील. राज्यपालांना भेटण्याआधी तिन्ही नेते आज एकत्र चर्चेला बसतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करतील आणि त्यानंतर निर्णय घेतील, असे म्हणत उदय सामंत यांनी विश्वास दर्शवला आहे की, एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री होतील.