अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
अक्कलकोट शहरातील प्रभाग क्रमांक २ अंतर्गत येणाऱ्या वडार गल्ली परिसरात प्रभाग निर्मितीनंतर प्रथमच एकाच वेळी विविध मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने स्थानिक रहिवाशांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे. वर्षानुवर्षे प्रलंबित असलेल्या पायाभूत सुविधांच्या कामांना अखेर गती मिळाल्याने या भागातील नागरिकांनी आनंद व्यक्त केला आहे.
डिसेंबर महिन्यात झालेल्या नगरपरिषद निवडणुकीदरम्यान वडार गल्ली परिसरात प्रचारासाठी गेलेल्या भाजप उमेदवारांना स्थानिक नागरिकांनी विविध समस्यांची माहिती दिली होती. परिसरात भूमिगत गटार व्यवस्था नसणे, नवीन पाणी जोडणीचा अभाव आणि रस्त्यांची दयनीय अवस्था यामुळे नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यावेळी उमेदवारांनी सत्ता आल्यास या समस्या प्राधान्याने सोडवण्याचे आश्वासन दिले होते. प्रभाग क्रमांक २ मधील स्थानिक नगरसेवक कस्तुराबाई चौगुले, लक्ष्मीकांत धनशेट्टी आणि अशोक जाधव यांनी या कामासाठी सातत्याने पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळत वडार गल्ली परिसरात जवळपास २० कुटुंबांना पहिल्यांदाच महत्त्वाच्या नागरी सुविधा मिळाल्या आहेत.
या कामांतर्गत परिसरात भूमिगत गटार व्यवस्था, नवीन पाणी नळ जोडणी तसेच सिमेंट काँक्रेट रस्ता अशी तीनही महत्त्वाची कामे एकाच वेळी पूर्ण करण्यात आली आहेत. या कामासाठी सुमारे १२ लाख रुपयांचा खर्च करण्यात आला असून त्यामुळे अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या समस्या मार्गी लागल्या आहेत. पावसाळ्यात साचणारे पाणी, चिखल आणि पिण्याच्या पाण्याच्या अडचणी यामुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना आता मोठा दिलासा मिळाला आहे.
या विकासकामांसाठी नगरपरिषद प्रशासनाचेही सहकार्य लाभले. तसेच नगराध्यक्ष मिलन कल्याणशेट्टी, उपनगराध्यक्ष बंटी राठोड आणि स्थानिक कार्यकर्ते अंकुश चौगुले यांचेही सहकार्य लाभल्याचे नगरसेवकांनी सांगितले. निवडणुकीच्या वेळी दिलेल्या आश्वासनाप्रमाणे काम पूर्ण झाल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त करत नगरसेवकांचे आभार मानले.