ध्यास विश्वसार्ह बातमीचा

निवडणूक विरुद्ध लग्नसोहळे : अजित पवारांची दुहेरी कसरत राज्यभर चर्चेत !

पुणे : वृत्तसंस्था

राज्यभर सध्या नगरपालिका-नगरपंचायत निवडणुकांचा धुरळा उडाला असताना उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र कौटुंबिक आणि राजकीय दोन्ही आघाड्यांवर एकाच वेळी तारेवरची कसरत करताना दिसत आहेत. कारण पवार कुटुंबात सध्या लग्नाची लगबग सुरू आहे. अजित पवारांचे पुतणे तसेच गेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांच्याविरुद्ध बारामतीतून उतरलेले युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा येत्या ३० नोव्हेंबर २०२४ रोजी मुंबईत पार पडणार आहे. तर अजित पवारांचे मोठे चिरंजीव जय पवार हे ५ डिसेंबर २०२४ रोजी बहरिनमध्ये लग्नगाठ बांधणार आहेत.

निवडणुकीच्या रणधुमाळीत नेहमी आघाडीवर असणारे जय पवार आणि त्यांच्या माता सुनेत्रा पवार हे दोघेही सध्या प्रचारापासून पूर्णपणे दूर आहेत. युगेंद्र पवारांनीही आपली प्रचाराची जबाबदारी आटोपती घेऊन लग्नाच्या तयारीला प्राधान्य दिले आहे. त्यामुळे पवार कुटुंबातील ही लग्नघाई निवडणुकीच्या निकालावर परिणाम करणार का? असा प्रश्नही उपस्थित होत आहे.

दुसरीकडे अजित पवार मात्र एकटे राज्यभर फिरताना दिसत आहेत. ‘लाडकी बहीण योजना’ आणि निधी वाटपाचा आधार घेऊन ते जोरदार प्रचार करत आहेत. शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते अद्याप नगरपालिका प्रचारात फारसे सक्रिय दिसत नाहीत. राज्यातील २४६ नगरपालिका आणि ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी प्रचार अंतिम टप्प्यात आला असून मतदान लवकरच होणार आहे. एकूणच, पवार कुटुंबात लग्नाचा आनंद आणि निवडणुकीची धामधूम असे दुहेरी वातावरण असताना अजित पवारांना दोन्ही जबाबदाऱ्या सांभाळताना खरीच कसोटी लागत असल्याचे चित्र आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!