अक्कलकोट : तालुक्यातील सांगवी बु ग्रुप ग्रामपंचायत येथे काल सायंकाळी ७ वाजता हनुमान मंदिरात ग्राम सुरक्षा दल या संदर्भात ग्रामस्थांची बैठक आयोजित करण्यात आली होती. दरम्यान, यावेळी तंटामुक्त अध्यक्ष नबीलाल शेख, पोलीस पाटील शुभांगी बाबर, सरपंच वर्षा भोसले, यांच्या मार्गदर्शनाखाली गावात ग्राम सुरक्षा दल स्थापन करून ग्राम सुरक्षा रक्षक यांना टी शर्ट वाटप करण्यात आले.
यात्रोत्सवातील बंदोबस्त, महामार्गावर घडणाऱ्या अपघाताप्रसंगी सहाय्य, नैसर्गिक आपत्ती व आपत्कालीन प्रसंगात मदत आदिंसाठी ग्रामसुरक्षा दल सक्रिय पुढाकार घेत असल्यामुळे पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण काहीअंशी हलका होण्यास हातभार लागला आहे. ग्रामीण भागात सुरक्षिततेचे वातावरण निर्माण करण्याच्या उद्देशाने महात्मा गांधी तंटामुक्त गाव मोहिमेंतर्गत गावोगावी स्थापन झालेल्या ग्रामसुरक्षा दलांचे महत्व, या निमित्ताने अधोरेखीत झाले आहे.
गाव पातळीवरील वाद सामोपचाराने मिटविणे आणि नव्याने तंटे निर्माण होऊ नयेत म्हणून प्रतिबंधात्मक उपक्रम राबविणे, असे तंटामुक्त गाव मोहिमेचे स्वरूप आहे. त्या अंतर्गत प्रत्येक ग्रामपंचायतीला ग्राम सुरक्षा दलाची स्थापना करणे अंतर्भूत आहे. ग्रामीण भागात वाडी, वस्त्यांवर पडणारे दरोडे आणि गुन्हेगारी घटनांना प्रतिबंध करणे, ही प्रामुख्याने या दलाची जबाबदारी. त्याकरिता दलाच्या सदस्यांकडून गस्त घातली जाते. या माध्यमातून स्थानिक पातळीवर सुरक्षा व्यवस्थेची फळी उभारली गेल्यामुळे पोलीस यंत्रणेवरील कामाचा ताण काहिसा हलका झाला. पोलीस ठाण्यांकडून दलाच्या सदस्यांना खास प्रशिक्षण व गणवेशही उपलब्ध करून दिला जातो. गावातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती कायम राखण्यासाठी पोलीस यंत्रणेला अतिरिक्त बळ उपलब्ध झाले.
याच बरोबर वेगवेगळ्या प्रसंगी वा घटनांमध्ये हे दल स्थानिक पातळीवर सक्रियपणे कार्यरत होत असल्याचे दिसून येते. या ग्राम सुरक्षा दल स्थापनेला गावातील मेजर बाळासाहेब भोसले, बालाजी रेड्डी, प्रविणकुमार बाबर, राजकुमार रेड्डी, माजी सरपंच अबूबकर शेख, विष्णू भोसले, इरफान शेख, रमजान मुल्ला,अंबादास डांगे, शंकर साबळे, सुभाष सोनकांबळे, राजू भोसले, मौलाली चाबुकस्वार, खासीम मुजावर, बकर शेख, मनोज भोसले, अजीम शेख, बंडू शेख, गजू बंडगर, गौसपाक पठाण, तात्या भोसले, बबलू भोसले, अभिजित माने, दिग्विजय घाटगे, अलमनवाज शेख, मनोज ढेंगले, प्रताप भोसले, हाजीमलंग मुजावर, तुकाराम सोनकांबळे, यांच्यासह गावातील सर्व नागरिक उपस्थित होते.