मुंबई : वृत्तसंस्था
गेल्या काही महिन्यापासून महायुती सरकारवर टीकेची झोड उठविणाऱ्या विरोधकांनी पुन्हा एकदा महायुतीच्या मुख्यमंत्र्यांनी कृषीमंत्र्यांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी केल्याने राजकारण तापले आहे. राज्यातील शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना कोर्टाने 2 वर्षाची शिक्षा सुनावली आहे. आता तरी मुख्यमंत्र्यांनी राजीनामा घ्यावा, अशी मागणी काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केली आहे. महायुती सरकारमधील उद्योगी आणि तेजस्वी लोकांमुळे दररोज सरकारची लाज निघत असल्याची टीका त्यांनी केली. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत असल्याचा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला.
कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांना 1995 च्या प्रकरणात 2 वर्ष कारावास आणि 50 हजार रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. माणिकराव कोकाटे यांच्यावर कागदपत्रांची फेरफार करून शासनाची फसवणूक केल्याचा आरोप आहे. या खटल्यावर आज नाशिक जिल्हा न्यायालयात सुनावणी पार पडली. यानंतर न्यायालयाने त्यांना शिक्षा सुनावली आहे. यावरून आता विरोधकांकडू महायुती सरकारवर निशाणा साधला असून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा घेण्याची मागणी होत आहे.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सोशल मीडिया एक्सवर पोस्ट करत सरकारवर हल्ला चढवला आहे. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावर करण्यात आला आहे. यात मंत्री माणिकराव कोकाटे आणि भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने दोन वर्षांची शिक्षा सुनावली आहे, 50 हजार रूपयांचा दंडही कोर्टाकडून ठोठावण्यात आला आहे. इतके उद्योगी आणि तेजस्वी लोक महायुती सरकारच्या मंत्रिमंडळात आहेत की दररोज सरकारची लाज निघत आहे, असा घणाघात वडेट्टीवार यांनी केला. दररोज आरोप होत आहे, कोर्टाकडून शिक्षेचे आदेश निघत आहे. मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्री आरोपी मंत्र्यांना स्वतः क्लिनचीट देऊन त्यांची पाठराखण करत आहे, असा आरोपही विजय वडेट्टीवार यांनी केला आहे.