मुंबई : वृत्तसंस्था
राज्यात महायुतीचे सरकार असताना देखील आता राष्ट्रवादी कॉंग्रेस अजित पवार गटाचे खासदार सुनील तटकरे यांनी पुन्हा एकदा शिवसेना शिंदे गटाचे नेते व मंत्री भरत गोगावले यांच्यावर नाव न घेत टीका केली आहे. हजारो कोटींची विकासकामे झाल्याचे बोणाऱ्यांची कामे मी जाड भिंगाचा चष्मा लाऊन पाहिली, दुर्बिण लाऊनही शोधली. पण महाडमध्ये विकास दिसलाच नाही, अशा शब्दांत तटकरे यांनी टोला लगावला आहे.
महाड नगरपरिषद निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा कार्यक्रम सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत पार पडला, त्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना भरत गोगावले यांच्यावर हल्लाबोल केला. तटकरे म्हणाले की, या निवडणुकीत त्यांच्यासमोर खूप महत्त्वाचे अजेंडे आहेत, विशेषतः गेल्या चार वर्षांपासून शहरात स्थानिक लोकप्रतिनिधी नसल्याने निर्माण झालेल्या समस्यांवर लक्ष केंद्रित करणे आवश्यक आहे.
सुनील तटकरे म्हणाले, मी अनेकांचे वक्तव्य ऐकतो की, महाड शहरात काही हजार कोटी रुपयांचा निधी आणला. शहरामध्ये मी फिरलो. दुर्बिण लावून बघितले. जाड भिंगाचा चष्मा लावला. पण मला तसं काही कुठे दिसले नाही. प्राथमिक शाळेची दुर्दैवी अवस्था पाहिली. ते पाहिल्यानंतर कुठे नेऊन ठेवलाय महाड? अशी स्थिती गेल्या चार वर्षात झालेली पाहायला मिळत आहे. महाड शहरात अनेक विकास कामे रखडली असून यावर बोलायला खूप वेळ आहे, असे म्हणत तटकरे यांनी गोगावले यांच्यावर टीका केली आहे.
महेंद्र दळवींच्या टीकेला सुनील तटकरेंचे प्रत्युत्तर
रायगड जिल्ह्यात शिवसेना शिंदे गट आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील वाद सतत वाढत आहे. महाड येथे माध्यमांशी बोलताना सुनील तटकरे यांनी शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलेल्या वक्तव्यांचा जोरदार समाचार घेतला. तटकरे म्हणाले की, दळवींनी केलेली वक्तव्ये निंदनीय आहेत आणि जो कोणी माझ्यावर टीका करत आहे, ती माणसे न्यूनगंड आणि भयगंडाने पछाडलेली आहेत. त्यांनी शिंदे सेनेच्या आमदारांना इशारा देत स्पष्ट केले की, राष्ट्रवादी आणि भाजप एकत्र येऊन नेटाने काम करतील.
दरम्यान, मंत्री भरत गोगावले यांच्या बालेकिल्ल्यात असलेल्या महाडमध्ये, भाजप आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आज मोठे शक्ती प्रदर्शन करत उमेदवारांचे अर्ज दाखल केले. महाड नगरपालिकेच्या या निवडणुकीत राष्ट्रवादीने भाजपसोबत युती केली असून, ते शिंदे गटाच्या शिवसेनेला शह देण्यासाठी जोरदार तयारीने रणांगणात उतरले आहेत. या युतीनुसार, राष्ट्रवादी 15 जागांवर तर भाजप 5 जागांवर निवडणूक लढवणार असून, नगराध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार आहे. भाजपने राष्ट्रवादीसाठी हातमिळवणी केल्यामुळे, शिंदे सेनेला कोंडीत पकडण्याचा खासदार सुनील तटकरे यांचा डाव यशस्वी होतो का, हे पाहणे यंदाच्या चुरशीच्या निवडणुकीत महत्त्वाचे ठरणार आहे.