ध्यास विश्वसार्ह बातमीचा

प्रत्येकाने अग्निहोत्र करून वातावरण शुद्धी व मन:शांती मिळवावी : औसेकर महाराजांची श्रीक्षेत्र शिवपुरीला भेट

अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी

अग्नीची उपासना म्हणजे साक्षात परमेश्वराची प्रार्थना आणि याची सुरुवात अक्कलकोटमधून झाली ही बाब अतिशय भाग्याची आहे.प्रत्येकाने अग्निहोत्र करून वातावरण शुद्धी व मन:शांती मिळवावी, असे आवाहन पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी केले. गुरुवारी, औसेकर महाराज यांनी श्रीक्षेत्र शिवपुरी येथे भेट देऊन या ठिकाणच्या पवित्र स्थळांची पाहणी केली.त्यावेळी ते बोलत होते प्रारंभी औसेकर महाराजांचे स्वागत संस्थेचे प्रमुख डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले व डॉ. गिरीजा राजीमवाले यांनी केले.यानंतर शिवपुरी संस्थांनच्यावतीने औसेकर महाराजांचा अग्निहोत्र पात्र व अन्य शिवपुरीची विविध उत्पादने देऊन सत्कार करण्यात आला.

यावेळी औसेकर महाराजांनी सर्व अनुयायांसोबत अग्निहोत्र केले.पुढे बोलताना औसेकर महाराज म्हणाले,१९८७ च्या दरम्यान मी शिवपुरीचा अनुभव घेतला आहे. इतके पवित्र स्थळ स्वामींच्या नगरीमध्ये आहे आणि याची कीर्ती जगभर आहे.या पिठाची परंपरा सध्या डॉ.पुरुषोत्तम राजीमवाले अतिशय उत्तम पद्धतीने चालवत आहेत.  त्यांचा या परंपरेविषयीचा अभ्यास खूप मोठा आहे. त्यांच्या माध्यमातून अग्निहोत्राचा प्रचार व प्रसार संपूर्ण जगामध्ये अतिशय जोमाने सुरू आहे.ही बाब ऐकून व पाहून अतिशय समाधान वाटले, असे मत त्यांनी व्यक्त केले.यावेळी बोलताना डॉ.राजीमवाले यांनी औसेकर महाराजांनी दिलेल्या सदिच्छा भेटीबद्दल समाधान व्यक्त केले व पंढरपूर देवस्थान विषयीची प्रगती आणि वाटचाल याबाबद्दल माहिती जाणून घेतली.

यावेळी डॉ.राजीमवाले यांनी देखील शिवपुरीची भविष्यातील वाटचाल याबद्दल त्यांना माहिती दिली.प्रारंभी त्यांनी गुरु मंदिरालाही भेट दिली.यावेळी सुधीर कुलकर्णी, अण्णा वाले,वक्रतुंड औरंगाबादकर,आबा महाराज कुरनूरकर,रामदेव चौधरी, जितेंद्रकुमार जाजू,डॉ.गणेश थिटे, धनंजय वाळुंजकर,मिलिंद पाटील, योगेश जोशी आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!