सोलापूर : वृत्तसंस्था
अक्कलकोट येथून सोलापूरला परत येत असताना उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्यावर प्राणघातक हल्ल्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात सहभागी असलेल्या चार आरोपींपैकी एकाला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, उर्वरित तिघांचा शोध सुरू आहे. या घटनेची फिर्याद सूर्यवंशी यांच्यासोबत असलेल्या सुरक्षा रक्षक पोलीस कॉन्स्टेबल वामन पिसे यांनी अक्कलकोट पोलीस ठाण्यात दिली आहे.
कारचा पाठलाग करुन हल्ल्याचा प्रयत्न
फिर्यादीमध्ये दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (दि. २८ )उद्योजक राणा सूर्यवंशी हे अक्कलकोटचे दर्शन करून आपल्या गाडीने सोलापूरकडे येत होते. त्याचवेळी बोलेरो जीपमधून आलेल्या हल्लेखोरांनी राणा यांच्या कारचा पाठलाग केला. हल्लेखोरांनी त्यांची कार अडवत उद्योगपती राणा सूर्यवंशी यांना रिव्हॉल्वर आणि तलवारीचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी दिली. या हल्ल्यात सचिन लालू राठोड (रा. मुळेगाव तांडा, सोलापूर), आकाश मधुकर चव्हाण (रा. वडजी कॅनल तांडा), कृष्णा फुलचंद पवार (रा. वडजी कॅनल तांडा) आणि अविनाश शिवाजी राठोड (रा. बक्षी हिप्परगा तांडा) या चार आरोपींचा सहभाग होता. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सचिन लालू राठोड याला ताब्यात घेतले. अन्य तिघे संशयित पसार झाले. उर्वरित तिघांना पकडण्यासाठी पोलिस पथके रवाना झाली आहेत. “या घटनेची आम्ही सखोल चौकशी करत आहोत. हल्ल्यामागचे नेमके कारण काय आहे आणि काही नवे पैलू समोर येतात का, याचाही तपास सुरू असल्याची माहिती सोलापूरचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी माध्यमांशी बोलताना दिली.