अक्कलकोट : तालुका प्रतिनिधी
दुधनी नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचे प्रथमेश म्हेत्रे यांनी बाजी मारल्यानंतर आता शहराचे लक्ष स्वीकृत नगरसेवक पद आणि उपनगराध्यक्ष पदाच्या निवडीकडे लागले आहे. या निवडीबाबत शहरवासीयांमध्ये कमालीची उत्सुकता असून राजकीय हालचालींना वेग आला आहे.
नगराध्यक्ष निवडीनंतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून स्वीकृत नगरसेवक व उपनगराध्यक्ष पदासाठी जोरदार फिल्डिंग लावण्यात येत आहे.येत्या दोन ते तीन दिवसांत जिल्हाधिकारी कार्यालयाकडून या निवडीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यावेळी दुधनी नगरपालिकेत दोन स्वीकृत नगरसेवक निवडले जाणार आहेत.
या निवड प्रक्रियेत एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नगराध्यक्ष पद वगळता म्हेत्रे कुटुंबातील एकही उमेदवार थेट नगरसेवक पदासाठी रिंगणात नव्हता. सर्वसामान्य कार्यकर्त्यांना संधी देण्याची भूमिका घेतल्याने पक्षातील अनेक निष्ठावंतांची नावे चर्चेत आली आहेत.
स्वीकृत नगरसेवक पदासाठी डॉ. उदयकुमार म्हेत्रे, बसवराज रायप्पा हौदे,राजशेखर सैदप्पा परमशेट्टी आणि सचिन सिद्धाराम झळकी यांच्या नावांची चर्चा सुरू झाली आहे.रुद्र प्रतिष्ठान तर्फे झळकी यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.त्यांनी गंगा आरती करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.त्यामुळे त्यांच्या नावाचीही जोरदार चर्चा आहे.या सर्व नावांमुळे पक्षांतर्गत हालचाली वाढल्या असून अंतिम निवडीबाबत उत्सुकता कायम आहे.
तर उपनगराध्यक्ष पदासाठी सिद्धाराम येगदी, सातलींगप्पा शरणप्पा परमशेट्टी, जिलानी चांद नाकेदार आणि महंतेश मुर्गेप्पा पाटील यांची नावे प्रामुख्याने समोर येत आहेत. या पदासाठी कोणाला संधी मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे या निवडणुकीत भाजप, काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गट यांच्यात तिरंगी लढत झाली होती. मात्र या लढतीत भाजप व काँग्रेसचा मोठा पराभव झाला असून शिवसेना शिंदे गटाने तब्बल २० पैकी २० जागा जिंकत निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे.
दूधनी नगरपालिकेत आतापर्यंत पुरुष नगराध्यक्ष असेल तर उपनगराध्यक्ष पुरुष आणि महिला नगराध्यक्ष असेल तर उपनगराध्यक्ष महिला अशी परंपरा राहिली आहे. ही परंपरा यावेळी खंडित होणार की पुन्हा कायम राहणार, याबाबत शहरात
चर्चांना उधाण आले आहे.
या सर्व निवडींचा अंतिम निर्णय माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे आणि त्यांचे बंधू शंकर म्हेत्रे हे घेणार असून त्यांच्या निर्णयाकडे संपूर्ण शहराचे लक्ष लागले आहे.सध्या तरी कोणाला संधी मिळते, यावर जोरदार चर्चा होत असल्याने ही निवड प्रक्रिया अधिकच महत्त्वाची मानली जात आहे.