ध्यास विश्वसार्ह बातमीचा

अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ५८० जणांची नेत्र तपासणी ; १३१ जण मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी पात्र

अक्कलकोट, दि.३० : येथील प्रसिद्ध सरकारी वकील अ‍ॅड.सर्जेराव जाधव यांच्या २५ व्या पुण्यस्मरणानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या नेत्रचिकित्सा शिबिरात ५८० जणांची तपासणी करण्यात आली व त्यातून १३१ जणांची निवड मोतीबिंदू शस्त्रक्रियेसाठी करण्यात आली. अ‍ॅड. सर्जेराव जाधव चॅरिटेबल ट्रस्ट व लोकनेते कै. ब्रह्मानंद मोरे समाजसेवा प्रतिष्ठान, कुरनूर यांच्यावतीने या शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

प्रारंभी याचे उद्घाटन तहसीलदार बाळासाहेब सिरसट व शिवपुरी विश्व फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. पुरुषोत्तम राजीमवाले यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष अ‍ॅड. शरदराव फुटाणे हे होते. व्यासपीठावर फत्तेसिंह शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राजीव माने, मोरे प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे, संस्थेचे विश्वस्त शिवाजीराव पाटील, माधुरी जाधव, माजी उपसभापती स्वामीराव पाटील, जेष्ठ नेते के.बी पाटील, अंबणप्पा भंगे, राम जाधव आदींची उपस्थिती होती.

प्रारंभी सर्व मान्यवरांच्या हस्ते अ‍ॅड. जाधव यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर प्रमुख कार्यकारी विश्वस्त सुरेशराव फडतरे कार्यक्रम आयोजनामागची भूमिका विशद केली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विश्वस्त शंकरराव पवार यांनी करून दिला.

यावेळी बोलताना तहसीलदार बाळासाहेब सिरसट म्हणाले की, अ‍ॅड.सर्जेराव जाधव आणि त्यांच्या संस्थेचे काम हे नोबेल पुरस्काराला पात्र आहे, अशा व्यक्ती समाजामध्ये खूप दुर्मिळ आहेत खऱ्या अर्थाने वंचितांची सेवा या संस्थेमार्फत सुरू आहे. डॉ. राजीमवाले म्हणाले, अ‍ॅड. सर्जेराव जाधव ट्रस्टचे कार्य अतिशय सेवाभावी वृत्तीने सुरू आहे कशाचीही आणि कुणाच्याही मदतीची अपेक्षा न करता अखंडपणे सुरू आहे. याबद्दल समाधान वाटते. अ‍ॅड.शरदराव फुटाणे म्हणाले, दरवर्षी हे कार्यक्रम आम्ही घेतो. यासाठी संस्थेने आचारसंहिता ठरविली आहे त्यानुसार आज तागायत कार्य सुरू आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष बाळासाहेब मोरे यांनी संस्थेच्या कार्याबद्दल प्रशंसा करून या कार्याचा विस्तार होण्यासाठी आपण सहकार्य करू, अशी ग्वाही दिली.

यावर्षी देखील अक्कलकोट तालुक्यातील आर्थिक दुर्बल घटकातील गरीब व गरजू व्यक्तींना धनादेश वाटप करण्यात आले. या शिबिरात प्रसिद्ध नेत्ररोग तज्ञ डॉ. अनुराधा अवस्थी, डॉ.वीरेंद्र अवस्थी यांनी रुग्णांची तपासणी केली. यावेळी त्यांना राजू मलंग, नीलकंठ कापसे यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन विश्वस्त मोहन चव्हाण यांनी केले तर आभार विश्वस्त संतोष फुटाणे जाधव यांनी मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!