मुंबई : वृत्तसंस्था
राज्यातील मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटलांनी मोठे आंदोलन उभे केले होते मात्र मनोज जरांगे पाटील यांच्या मुंबईतील आंदोलनाला मुंबई उच्च न्यायालयाने परवानगी नाकारली आहे. मुंबईच्या बाहेर आंदोलन करण्यास परवानगी दिली आहे. यावर न्यायदेवता आम्हाला न्याय देईल, अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी दिली आहे. तसेच लोकशाहीच्या मार्गाने आंदोलन करण्याचा आमचा हक्क आहे, हे लोकशाहीच्या विरोधात होत आहे. गरीब लोकांच्या वेदना आहेत, गरीब बांधवांना न्याय देण्याचे काम न्यायदेवता करेल. न्यायदेवता शंभर टक्के न्याय देणार, असा विश्वास मनोज जरांगे यांनी व्यक्त केला आहे. तसेच हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे षड्यंत्र असल्याचा आरोप जरांगे यांनी केला आहे.
मनोज जरांगे पाटील म्हणाले, आम्ही शांततेत तिथे येणार आहोत. गेल्यावेळेस सुद्धा आमच्यासोबत असेच केले होते. परंतु, न्यायदेवता आम्हाला न्याय देणार. आमचे सुद्धा वकील मित्र न्यायालयात जातील आणि आम्ही मुंबईला जाणारच, अशी भूमिका जरांगे पाटलांनी घेतली आहे.
पुढे बोलताना मनोज जरांगे म्हणाले, सरकारच्या जिवावर आले आहे आमच्या मागण्या मान्य करण्याचे. 27 तारखेला आम्ही इथून मुंबईला जाणार. 29 ऑगस्ट रोजी मी मुंबईच्या आझाद मैदानात येणार आहे. न्यायाच्या प्रक्रियेवर मला काहीही बोलायचे नाही. आमचे वकील न्यायालयात जाणार आणि आम्हाला न्याय मिळणार. मी न्यायालयावर काही बोलणार नाही पण मी सरकारला सांगतो की मी मुंबईत येणार. असा कोणताही दुहेरी कायदा नाही, जनतेच्या भावनेचा आणि कायदेशीर मागण्या मागण्याचा आम्हाला पूर्ण अधिकार आहे. तसेच आझाद मैदान का नाही? असा सवालही जरांगे यांनी उपस्थित केला आहे.
सरकारने कितीही प्रयत्न केले तरी आम्ही आंदोलन करणार. हा सगळा सरकारचा खेळ आहे, फडणवीस सरकारचा. आमच्या मागण्या रास्त आहेत, लोकशाही मार्गाने आंदोलन करत आहोत, शांततेत आमरण उपोषणाची आम्ही भूमिका घेतली तेव्हाच हे सरकार हालले. देवेंद्र फडणवीस यांना मराठा समाजाचे कल्याण झालेले बघवत नाही, असा आरोपही जरांगे यांनी केला आहे.
गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न केला पण ते फसला. त्यामुळे आता न्यायालयात गेले. न्यायालयाने काय सांगितले आहे त्यावर आमचे वकील बांधव जातील न्यायालयात. अडथळा होणार नाही असे नियम देईल न्यायदेवता, आंदोलन करू नका हे सांगू शकणार नाही. उपोषण आझाद मैदानात करू देणार नाही, असे न्यायालय सांगू शकत नाही. तसेच हे फडणवीस यांचे षड्यंत्र असून ते तोडून काढायला मी खंबीर आहे, असे मनोज जरांगे म्हणाले.