ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फडणवीसांनी आंदोलनाला गालबोट लावण्याचा खटाटोप करू नये ; जरांगे पाटील !

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यातील महायुती सरकारने २७ ऑगस्टपर्यंत मराठा समाजाच्या मागण्यांची पूर्तता करावी, अन्यथा आम्ही एकदा आंतरवाली सराटी सोडली की जोपर्यंत मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत परत येणार नाही. लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहोत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी आंदोलन मोडीत काढण्याचा, पोलिसांच्या धमक्या देण्याचा, आंदोलनाला गालबोट लावण्याचा खटाटोप करू नये, नाही तर समाज त्यांना खाक करून टाकेल, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांसाठी २७ ऑगस्ट रोजी आंतरवाली सराटी येथून मुंबईकडे निघणाऱ्या महामोर्चाची तयारी जोरात सुरू असून या पार्श्वभूमीवर झाल्टा फाटा येथे गुरुवारी आयोजित बैठकीत मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे यांनी समाजबांधवांना मार्गदर्शन केले. ते पुढे म्हणाले की, आपसातील वाद बाजूला ठेवा. मी कुठे चुकलो असेन तर विसरा. समाजाचे हित नेहमी माझ्या डोळ्यासमोर आहे. मी कधी समाज विकला नाही किंवा समाजाची मान झुकू दिली नाही. आज शारीरिक, मानसिक व राजकीय त्रास असूनही समाजाच्या पायाशी जीव द्यायला तयार आहे, असे त्यांनी ठामपणे सांगितले.

दगडफेक, जाळपोळ न करता शांततेचा मार्ग स्वीकारा : वकील, शिक्षक, राजकीय नेते, अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या गाड्या पार्किंगमध्येच असतात. त्या आता बाहेर काढाव्यात. तेवढ्या गाड्या बाहेर निघाल्या तरी ३ लाख चालक व त्यांच्यासोबत ५ जण जरी आले तर १८ लाख मराठा आंदोलनात सहभागी होतील.

शिंदे समितीने जो सरकारला अहवाल सादर केला आहे, त्यात ५८ लाख मराठा कुणबी नोंदी असल्याची नोंद आहे. एकाचे चार जरी पकडले तरी ३ कोटींवर मराठ्यांना ओबीसी आरक्षणाच्या प्रवाहात आणले आहे. उर्वरित समाजालाही ओबीसीतून आरक्षण मिळावे यासाठी आपला हा लढा असून यात सर्वांनी सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले. लेकरांच्या भविष्यासाठी मुंबईला जाणे आवश्यक आहे. समाजाने मला हरताना पाहू नये म्हणून मी तग धरली आहे. लढणार नाही तर मरणार, पण आरक्षणाशिवाय परत येणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.

 

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!