ध्यास विश्वसार्ह बातमीचा

फडणवीसांचे अनोखे अभियान : लाडक्या बहिणींसाठी आता ‘श्रावण प्लान’

मुंबई : वृत्तसंस्था

राज्यात महायुतीने विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. त्यासाठी महिला मतदारांवर विशेष लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. लाडकी बहीण योजनेला राज्यभरातून मोठा प्रतिसाद मिळाला आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी श्रावणाच्या पवित्र महिन्यात एक अनोखे अभियान हाती घेतले आहे.
श्रावण महिन्यातील सोमवारांना विशेष महत्त्व असते. श्रावणातील सोमवारी भाविक मोठ्या संख्येने शिव मंदिरांमध्ये जातात. त्यात महिलांचे प्रमाण लक्षणीय असते. श्रावणातील सोमवारी उपवास करणाऱ्या महिलांची संख्या मोठी आहे. यातून श्रावणी सोमवारांचे महत्त्व अधोरेखित होते. हीच बाब लक्षात घेऊन उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी श्रावणातील दर सोमवारी शिव मंदिरांमध्ये ‘मेरा वचन, मेरा शासन’च्या बॅनरखाली एक नवे आश्वासन देतील. या माध्यमातून राज्यातील जवळपास चार कोटी महिलांपर्यंत पोहोचण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या अभियानातून भाजप महिलांशी थेट संवाद साधेल.

भाजपसाठी महिला मतदार कायमच महत्त्वाच्या राहिल्या आहेत. 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत भाजपने तिकीट देताना महिलांना प्राधान्य दिले. भाजपचे 105 उमेदवार विजयी झाले. त्यातील 12 महिला होत्या. हाच पॅटर्न कायम राखण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. गेल्या दशकभरात झालेल्या निवडणुकांमधील मतदान पाहिल्यास महिला मतदारांची संख्या सातत्याने वाढत आहे. महिला मतदारांच्या वाढत्या संख्येचा फायदा भाजपला होत आला आहे. त्यामुळेच भाजपने विविध योजनांच्या माध्यमांमधून महिला मतदारांना आपल्याकडे राखण्याचा प्रयत्न केला आहे.

महिलांशी साधणार थेट संवाद
उज्ज्वला योजना, लखपती दिदी, मुद्रा योजनेच्या माध्यमातून केंद्राने महिला मतदारांकडे विशेष लक्ष दिले. आता राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महायुती महिला मतदारांना साद घालत आहे. ही योजना मध्य प्रदेशात भाजप सरकारने सर्वप्रथम राबवली. योजनेचा फायदा भाजपला विधानसभा निवडणुकीसह लोकसभेला देखील झाला. त्यामुळेच हीच योजना आता महाराष्ट्रात राबवली जात आहे. दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांनी श्रावण प्लान आखलेला आहे. या प्लानच्या माध्यमातून महिलांशी थेट संपर्क साधण्याचा प्रयत्न भाजप करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!